Majjacha Adda with Ashok Saraf : कलाकारांच्या कलेचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात येत असतं. कलाकारांकडून मिळणार कौतुक हे त्या कलाकारासाठी त्यांच्या कामाची पोचपावती असते. असे अनेक कलाकार आहेत ज्यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांच्या प्रेमापोटी ही कलाकार मंडळीही त्यांच्या कलेला सादर करत त्यांचं मनोरंजन करत असतात. अशीच एक फॅन मुमेंट अभिनेते अशोक सराफ यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितली. अशोक सराफ यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.
अशोक सराफ यांनी इट्स मज्जाच्या मज्जाचा अड्डा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना अशोक मामांनी त्यांच्या चाहत्यांचा एक किस्सा शेअर केला. अशोक मामा म्हणाले, ‘राम राम गंगाराम’ चित्रपटात मी म्हमद्या खाटिकाची भूमिका साकारली होती. ती भूमिका तेव्हा विशेष लोकप्रिय झाली होती. चित्रपटाची गोल्डन जुबली झाली. या चित्रपटातील भूमिकेसाठी मला दोन अवॉर्ड मिळाले. ‘महाराष्ट्र स्टेट गव्हर्मेंट’ व ‘फिल्मफेअर’ असे दोन पुरस्कार मिळाले. त्यावेळी ती भूमिका विशेष लोकप्रिय झाली”.
आणखी वाचा – श्रेयस तळपदेच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, तब्बल ४८ तासांनी अभिनेत्याने प्रतिसाद दिला अन्…
यापुढे ते म्हणाले, “त्यानंतर मी ‘हमीदाबाईची कोठी’ हे नाटक करत होतो. ‘हमीदाबाईची कोठी’ नाटकातील माझी भूमिका ही पूर्णतः निराळी होती. विनोदावर आधारित असं ते पात्र नव्हतं. या नाटकात गुंडाची भूमिका मी साकारली होती. मात्र नाटकांच्या शेवटी हा गुंड, हा जो दादा असतो तो पूर्णपणे खल्लास होतो. अगदी गंभीर अशी ती भूमिका होती. श्रीरामपूरला या नाटकाचा प्रयोग होता. हाऊसफुल्ल असा तो शो होता. नाटकांच्या सुरुवातीला अगदी रुबाबात गुंडाच्या वेशात मी एंट्री घेतली. मात्र नाटक संपताना हे पात्र अगदी आक्रोश करुन संपून जात”.
चाहत्याचा किस्सा शेअर करत ते म्हणाले की, “इतकं असताना एक माझा चित्रपटाचा चाहता प्रेक्षकांमध्ये बसला होता. तो राम राम गंगाराम चित्रपटाचा खूप मोठा चाहता होता. तो नाटकाच्या शेवटी अगदी जोराने ओरडला. अरे बघा रे बघा आपल्या म्हमद्या कसा दलिंदर झाला, म्हणजे त्याने पाहिलेला म्हमद्याची ही झालेली अवस्था त्याला आवडली नाही. त्याचा म्हमद्या मरताना त्याला पाहवला नाही. ही अभिनेता म्हणून खूप मोठी पावती आहे. त्या प्रेक्षकाने केलेलं हे एक कौतुकचं आहे” असं म्हणत त्यांनी चाहत्यांची ही आठवण शेअर केली.