Majjacha Adda with Ashok Saraf : अशोक सराफ आणि विनोद हे अनोखं समीकरण आहे. उत्कृष्ट अभिनयशैली, विनोदाचं अचूक टायमिंग, हटके बोलीभाशा यांत अशोक मामांचा हात कुणीही धरू शकत नाही, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कित्येक कलाकार मंडळी हे अशोक सराफ यांच्या अभिनयापासून प्रेरित आहेत. गेली कित्येक वर्षे अशोक मामांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. आजवर अशोक सराफ यांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
विनोदाचा बादशाह अशी ओळख असलेले मामा विनोदाची वेळ चुकली की दुखी होतात. नुकत्याच ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी विनोदाच्या टायमिंगबाबत भाष्य केलं. अशोक सराफ म्हणाले, “एखादा विनोद केला आणि तो लोकांपर्यंत नाही पोचला तर अतिशय दुःख होत. तो विनोद लोकांपर्यंत का पोचला नसेल, आपली नेमकी यात काय चूक झाली, वेळ इकडे तिकडे झाली का? असे अनेक प्रश्न येतात. मात्र वेळ ही इकडे तिकडे होत नाही, आणि ही वेळ शब्दात सांगता येत नाही. ही वेळ चुकली का, नेमकं काय झालं असेल असं काही झालं की खूप गोंधळ उडतो. आणि विनोदाची ही वेळ चुकू नये म्हणून मी अक्षरशः आटापिटा करत असतो.
अशोक मामा पुढे म्हणाले, “स्टेजवर वापरत असताना मी यासाठी कायम सतर्क असतो. आजुबाजुकडे माझं अजिबात लक्ष नसत. कारण वेळ ही गोष्ट किती महत्त्वाची आहे हे सहसा कोणाला कळत नाही. प्रेक्षकांना एखादा विनोद आवडला की ते खळखळून हसतात. पण यामागे त्या विनोदाचा वेळ महत्त्वाचा असतो. एखाद विनोदी वाक्य तुम्ही कसं बोलता, त्या वाक्याची शुद्धता आणि ते वाक्य सरताना समोरच्या सहकलाकाराने त्याच वाक्य कुठून सुरु करायचं याचीही एक वेळ असते. आणि हे असं झालं तर त्याचा प्रभाव पडतो”.
यापुढे उदाहरण देत ते म्हणाले, “‘एक होता शिंपी’ या नाटकादरम्यान लेखकाने मला एक मोठं वाक्य लिहून दिलं होत, आणि ते वाक्य पूर्ण झालं की प्रेक्षकांचा मोठा हसा मिळायचा. एकेदिवशी मी म्हटलं हे माझं वाक्य आहे, ते तोडून मी तुला तीन लाफ्टर काढून दाखवतो असं म्हटलं. आणि ते वाक्य मी तीन ठिकाणी तोडलं आणि तीन ठिकाणी तीन लाफ्टर मिळवले. बऱ्याच मोठमोठ्या कलाकारांनाही हे टायमिंगचं गणित माहित नव्हतं. जेव्हा विनोदाची वेळ चुकते तेव्हा मला खूप दुःख होतं” असं ते म्हणाले.