‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली गायिका म्हणजेच मुग्धा वैशंपायन. मुग्धाने आजवर तिच्या आवाजाच्या जादूने साऱ्या रसिक प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून मुग्धाने तिच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. आता मुग्धा गायनसेवा करत अनेक दौरे करतानाही दिसते. गायन सेवेसाठी मुग्धा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही दौरे करत असते. सोशल मीडियावरही मुग्धा बऱ्यापैकी सक्रिय असते. मुग्धा तिचे नेहमीचे अपडेट चाहत्यांसह शेअर करत असते. चाहतेही मुग्धाने शेअर केलेल्या फोटो, व्हिडीओला पसंती दर्शवतात. अशातच मुग्धाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला ती अंदमानला गेली असल्याचे सांगितले आहे. (Mugdha Vaishampayan story)
गेली दोन वर्ष मुग्धा सतत अंदमान येथे जाऊन गायनसेवा करत आहे, याची माहिती तिने इंस्टाग्रामवरुन यापूर्वी दिली आहे. अशातच मात्र अंदमानला गेल्यावर मुग्धाने याआधी गायनाव्यतिरिक्त काहीही शेअर केलं नव्हतं मात्र आता एका स्टोरीने तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गायनाच्या व्यस्त शेड्युलमधून वेळात वेळ काढत मुग्धाने अंदमानातील समुद्रकिनाऱ्याची सफर केली आहे.

अंदमानच्या समुद्रकिनारी पाण्यात पाय बुडवतानाचा एक व्हिडीओ शेअर करत तिने म्हटलं आहे की, “मला समुद्र अशक्य आवडतो. अंदमानचे सगळे बीचेस विलक्षण सुंदर आहेत. गेली दोन वर्षे इतका वेळा अंदमानला येते पण कामाच्या निमित्ताने इकडे येत असल्यामुळे एवढ्यावेळा येऊनही कधीही समुद्रात गेले नव्हते. पण आज मोह आवरला नाही त्यामुळे पाय बुडवलेच”, असं म्हणत तिने हा सुंदर असा अंदमानातील समुद्रकिनाऱ्यावरील व्हिडीओ शेअर केला आहे.
काही दिवसांपूर्वीच मुग्धा उत्तरप्रदेश येथे देखील गायनसेवेसाठी गेली होती. शिवाय महाराष्ट्रातील प्रसिद्ध दत्त मंदिर गाणगापूर येथे देखील मुग्धाने हजेरी लावत गायनसेवा केलेली पाहायला मिळाली. यावेळी ती तिचा पती प्रथमेश लघाटेसह गेली होती. मुग्धा व प्रथमेश यांनी काही दिवसांपूर्वीच विवाहसोहळा उरकत साऱ्यांना सुखद धक्का दिला. ‘आमचं ठरलं’ म्हणत त्यांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली सोशल मीडियावरुन दिली आणि त्यानंतर थेट डेस्टिनेशन वेडिंग करत लगीनगाठ बांधली. मुग्धा व प्रथमेशच्या शाही विवाहसोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावरुन व्हायरलही झाले आहेत.