“आई”… म्हणजे प्रत्येकाच्याच हृदयाजवळचा एक हळवा कोपरा असतो. आईसारखे दैवत अवघ्या जगतात नाही हे काही खोटे नाही. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या आईबद्दल भावना व्यक्त करताना भावुक होतोच. अभिनेते मिलिंद गवळी यांनीही आपल्या आईबद्दलची अशीच भावुक पोस्ट शेअर केली आहे. मिलिंद गवळी सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच नुकतीच त्यांनी आईबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे.
मिलिंद यांनी सोशल मीडियावर त्यांच्या आईचा एक खास व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही म्हण मी लहानपणापासून ऐकत आलो आहे आणि ती म्हण अगदी खरी आहे, अजून एक अशीच म्हण आहे. ‘मातृदेवो भव:’ ती पण म्हण खरी आहे. २ मार्च २००९, माझ्या आईला जाऊन आज बरोबर पंधरा वर्षे झाले. या पंधरा वर्षात अनेकदा मी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात, तुळजापूरला आई भवानीच्या मंदिरात, वणीला सप्तशृंगी मंदिरात किंवा एकवीरा देवीच्या मंदिरात गेलो की, त्या मूर्त्यांमध्ये मला माझ्या आईचा भास होतो”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “आज शरीराने ती आमच्यात नाही, पण तिने हे देवीचे रूप धारण केलं आहे असंच मला वाटतं, जी कोणी माऊली मला भाकरी खाऊ घालते, तिच्या रूपात पण मला माझी आई दिसते. आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक नाती जगत असतो आणि मी तर अनेक वर्ष कलाकार म्हणून पण जगत आहे. अनेक भूमिका करण्याची मला संधी मिळाली आहे. अनेक नाती अनुभवता व जगता आली आहेत. त्या सगळ्या नात्यांमध्ये ‘आई-मुला’चं नातं हे सर्वात श्रेष्ठ आहे. जगामध्ये या पवित्र नात्यापेक्षा इतर कोणतं नातं असूच शकत नाही असं माझं मत आहे”.
म्हणून मला सारखं वाटतं की ज्यांच्या ज्यांच्याजवळ त्यांची आई आहे ते फार नशीबवान माणस आहेत. आजच्या दिवशी तिचे विचार, तिचं म्हणणं, तिचं जगणं मला व्यक्त करावसं वाटलं. फक्त निस्वार्थ प्रेम करा, काहीच अपेक्षा करू नका, आपण काय घेऊन आलोय? आणि आपण काय घेऊन जाणार? तर फक्त लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद तिचं कायम हेच म्हणणं असायचं”.
दरम्यान, मिलिंद यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये अनेकांनी त्यांच्या आईबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. “आई ही आईच असते, तुम्ही खूप छान भावना व्यक्त केल्या आहेत, विनम्र अभिवादन” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.