लोकप्रिय मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता अजिंक्य ननावरे ही लोकप्रिय जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली. ३१ जानेवारी रोजी या जोडीने विवाह करत त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. गेल्या काही काळापासून ही दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे त्यांच्या लग्नाविषयी साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. अशातच या जोडीने ३० जानेवारी रोजी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्यांच्या नात्याविषयी अधिकृतपणे सांगितले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवानी-अजिंक्य ही विवाहबंधनातदेखील अडकले.
शिवानी-अजिंक्य हे दोघे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आसतात. सोशल मीडियावर ते त्यांच अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच दोघांनी त्यांच्या लग्नाला १ महिना पूर्ण होताच सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. “तुम्ही मजा करत असताना वेळ अगदी सहज निघून जातो” असं म्हणत या दोघांनी लग्नाला १ महिना पूर्ण झाल्यानिमित्त एकमेकांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
या व्हिडीओमध्ये दोघेही एकमेकांशी अगदी आनंदाने एन्जॉय करताना दिसत आहेत. शिवानी-अजिंक्य यांनी लग्नानंतर कुठल्यातरी अज्ञात स्थळी भेट दिल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये अजिंक्यने घोडेस्वारीदेखील केली असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवानी-अजिंक्यने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी दोघांना लग्नाला १ महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
दरम्यान, या दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अजिंक्य सध्या झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तर शिवानी ही नुकतीच ‘झिम्मा २’ या चित्रपटात झळकली होती.