‘सारेगमप’ या लोकप्रिय कार्यक्रमातून नावारुपास आलेली गायिका म्हणजे आर्या आंबेकर. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटगीत व मालिकांचे शीर्षकगीत गायले आहेत. सध्याच्या आघाडीच्या गायिकांमध्ये आर्याचे नाव आग्रहाने घेतले जाते. आर्या गायिका असण्याबरोबरच एक उत्तम अभिनेत्रीदेखील आहे. ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून तिचा अभिनय पाहायला मिळाला होता. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचा चांगलाच चाहतावर्गदेखील आहे. तिच्या फोटोला चाहत्यांकडून अनेक लाईक्स व कमेंट्स मिळत असतात. अशातच तिने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Aarya Ambekar On Instagram)
आर्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. हा फोटो शेअर करत तिने चाहत्यांना एक आवाहन केले आहे. आर्याने स्वत:चा एक सेल्फी फोटो पोस्ट करत त्याखाली एक नोट लिहिली आहे. यात तिने असं म्हटलं आहे की, “तुम्हा सर्वांबरोबर एक गोष्ट शेअर करायची आहे. बघता बघता डिसेंबर महिना सुरू झाला आणि नवीन वर्ष सुरू होण्यासाठी फक्त ३१ दिवस राहिले आहेत. या वेळात मी स्वत:ला सोशल मीडियापासून दूर ठेवणार आहे आणि इतर गोष्टींना प्राधान्य देणार आहे. आपल्या आयुष्यात आजूबाजूला सतत डिजिटल गोंधळ सुरू असतो. त्यापेक्षा हे ३१ दिवस मन:शांतीसाठी वैयक्तिक ध्येयाकडे लक्ष देण्यासाठी, तसेच स्वत:ची मूल्य व नाती सांभाळण्यासाठी त्याचबरोबर एक चांगला माणूस होण्याकडे लक्ष देऊया. तुम्हीही माझ्याबरोबर हे आव्हान स्वीकाराल का?”
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्री आर सुब्बालक्ष्मी यांचं निधन, चित्रपटात सुशांत सिंह राजपूतच्या आजीची साकारली होती भूमिका
या पोस्टद्वारे आपण काही दिवस सोशल मीडियापासून दूर राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तिच्या काही चाहत्यांना धक्का बसला असला तरी काही चाहत्यांनी तिच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तिच्या या पोस्टखाली नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. “खुपच छान कल्पना आहे, प्रयत्न करुन बघायला काही हरकत नाही, होय नक्कीच, मी सुध्दा तुझ्याबरोबर हे करून पाहतो, हे ३१ दिवस सोशल मीडियापासून दूर आणि तुमच्या गाण्याबरोबर राहणार, सोशल मीडिया हा खुपच कंटाळवाणा झाला आहे, त्यामुळे तू खुपच चांगला निर्णय घेतला आहेस” अशा अनेक कमेंट्स करत तिला प्रोत्साहन दिले आहे.
तर काही नेटकऱ्यांनी “कृपया तू सोशल मीडिया सोडू नकोस, आम्हाला तुला नेहमी बघायची सवय लागली आहे, तुझ्या या निर्णयामुळे आम्हाला दु:ख झाले आहे. तुझा निर्णय चांगला आहे पण आम्हाला याची सवय नाही” अशा अनेक कमेंट्स करत तिच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, सोशल मीडियापासून दूर राहण्याच्या या काळात ती नक्की काय करणार आहे? त्याचबरोबर ती सोशल मीडियावर पुन्हा कधी येणार? यांची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.