छोट्या पडद्यावरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेला सध्या प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे. ऋषिकेश शेलार, कविता लाड, शिवानी रांगोळे यांच्यासह मालिकेतील इतर कलाकारांच्या भूमिकांचंही विशेष कौतुक होत आहे. विशेष म्हणजे अगदी कमी कालावधीमध्ये ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ टीआरपीच्या शर्यतीमध्ये टॉपला आहे. आता येत्या १ तारखेलाला या मालिकेचा विशेष भाग पाहायला मिळणार आहे. यामध्ये मालिकेती मुख्य पात्र अक्षरा (शिवानी रांगोळे) व अधिपतीचा (ऋषिकेश शेलार) शाही विवाहसोहळा प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. या विवाहसोहळ्याचीच चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.(Akshara and adhipati wedding look)
गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरा व अधिपतीची लगीनघाई मालिकेमध्ये सुरु आहे. अधिपतीची आई म्हणजे भूवनेश्वरीला (कविता लाड) लेकाचं लग्न भव्यदिव्य करायची इच्छा आहे. त्याच दिशेने आता मालिकेने एक अनोखं वळण घेतलं आहे. या मालिकेच्यानिमित्ताने टेलिव्हीजन विश्वात आणखी एक शाही विवाहसोहळा पार पडणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

अक्षरा व अधिपतीच्या लग्नाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांच्या अपेक्षेप्रमाणेच हा विवाहसोहळा होणार असल्याचं आता समोर आलं आहे. लग्नसोहळ्यात मुख्य पात्रांच्या लूककडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे. साडी, दागिने, मराठमोळा साज सारं काही अगदी खास आहे. अक्षरा व अधिपतीचे पारंपरिक लूकमधील काही फोटो समोर आले आहेत.

या फोटोंमध्ये अक्षरा हिरव्या रंगाच्या साडीत पाहायला मिळत आहे. तिने साडीला साजेसे दागिने घातले आहेत. यावर तिने कोल्हापूरी साज, बाजूबंध, हातात तोडे, नाकात नथ, कानात झुमके घातले आहेत. शिवाय तिच्या कपाळावरील चंद्रकोर विशेष लक्ष वेधून घेणारी आहे. तर दुसरीकडे अधिपतीनेही जांभळ्या रंगाचा सदरा पायजमा, डोक्यावर हिरव्या रंगाचा फेटा बांधत पारंपरिक पेहराव केला केला. ही मालिका कथानकाबाबत प्रेक्षकांची आणखीनच उत्सुकता वाढवणार एवढं नक्की.