सध्या अनेक मराठी कलाकार हिंदी कलाविश्वात आपला ठसा उमटवत आहेत. अभिनेत्री सई ताम्हणकर, अभिनेत्री प्रिया बापट यांच्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री या विश्वात पदार्पण करत आहे. ती म्हणजे मृण्मयी देशपांडे. मृण्मयीने नुकतीच याबाबत एक पोस्ट शेअर केली. त्यात तिने तिच्या आगामी हिंदी प्रोजेक्टची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. बहुचर्चित ‘मुंबई डायरीज’ या लोकप्रिय वेब सीरिजच्या पुढिल भागात मृण्मयी झळकणार आहे. (Mrunmayi Deshpande entry in superhit hindi web series)
‘मुंबई डायरीज’ ही वेबसिरीज २०२१मध्ये प्रदर्शित झाली होती. त्याच्या पहिल्या भागात अभिनेता मोहित रैना, अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा, अभिनेत्री धन्वंतरी यांच्यासह अनेक कलाकार यात मुख्य भूमिका साकारली होती. २६/ ११ मुंबईत झालेला बॉम्ब हल्ला ही कधीही न विसरता येणारी घटना आहे. मुंबईत गर्दीच्या ठिकाणी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यावेळी अनेक लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. सीसॅट परिसरात झालेल्या गोळीबारात अनेक जण जखमी झाले. त्यांना जवळच्या कामा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी तिथल्या डॉक्टरांनी कशाचीही पर्वा न करता जखमी लोकांचे प्राण वाचविण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. मर्यादित साधनांमध्येही त्यांनी ही जबाबदारी घेतली. त्यावेळी रुग्णालयात नेमकी काय परिस्थिती होती याचं कथन ‘मुंबई डायरीज’च्या पहिल्या भागात दाखवण्यात आलं आहे. याच सीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
निखिल अडवाणी व निखिल गोंजाळवीस दिग्दर्शित ही सीरिज असून पहिल्या भागात अभिनेता मोहित रैनाने आपल्या दमदार अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली. या सुपरहिट वेब सीरिजमध्ये मृण्मयीला काम करण्याची संधी मिळाली आहे. या सीरिजच्या दुसऱ्या भागाचं तिने पोस्टर शेअर करत, ‘बॉम्बे जनरल हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन वादळ घेऊन येत आहोत’, असं कॅप्शन दिलं आहे. ‘मुंबई डायरीज’चा दुसरा भाग मुंबईमध्ये २६ जुलै २००५मधील ढगफुटीच्या परिस्थितीची आठवण करू देतो.
या पोस्टवर बऱ्याच जणांनी कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे. अभिनेत्री सायली संजीव, अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे तसेच अभिनेता आदिनाथ कोठारे या मराठी कलाकरांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या.