Gulkand Movie Team In Girgaon Shobhayatra 2025 : हिंदू नवर्षाचा शुभारंभ असलेला गुढीपाडवा सण मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात पार पडला. ढोल ताशांचा गजर, झांज, लेझीमच्या तालावर नटूनथटून पारंपरिक वेषात नववर्षांचे स्वागत करण्यात आले. मिरवणुका, शोभायात्रांमधून मराठी भाषा कशा जपायची याशिवाय समानता, एकता याचे गुढी उभारुन संदेश देण्यात आले. यंदाही मुंबईतील गिरगाव परिसरात शोभायात्रांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात, जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. याचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. नऊवारी, पैठणी साड्या त्यावर दागिण्यांचा साज, डोक्यावर फेटा आणि पायात कोल्हापूर चप्पल असा पेहराव करत मराठमोळ्या अंदाजात महिलांनी शोभायात्रेची शोभा वाढविली.
गिरगांवची शोभायात्रा पाहायला संपूर्ण मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या शहरांमधील लोक गर्दी करतात. गिरगांवची शोभायात्रा हा एक सण आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. यंदाच्या या गिरगांवच्या शोभायात्रेत एका मराठी चित्रपटाची हवा पाहायला मिळाली. हा चित्रपट म्हणजे ‘गुलकंद’. ‘गुलकंद’ या मराठमोळ्या चित्रपटाची टीम गिरगांवच्या शोभायात्रेत झळकली. यावेळी सई ताम्हणकर, समीर चौघुले, प्रसाद ओक, ईशा डे, जुई भागवत ही चित्रपटातील कलाकार मंडळी उपस्थित होती. तर लेखक, दिग्दर्शक सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांचीही उपस्थिती दिसली.
आणखी वाचा – तलवारबाजी, शिस्तप्रिय अन्…; मकरंद अनासपुरेंकडून लेकाचं भरभरुन कौतुक, बाप-लेकाची पहिलीच मुलाखत
गुढी पाडव्यानिमीत्त ‘गुलकंद’ चित्रपटाची टीम गिरगाव शोभा यात्रेत पोहोचली आणि शोभायात्रेत आलेल्या सर्वांनी त्यांची झलक पाहण्यास गर्दी केलेली पाहायला मिळाली. यंदाच्या शोभायात्रेत ‘गुलकंद’च्या टीमची भरपूर चर्चा रंगली. सचिन गोस्वामी दिग्दर्शित आणि सचिन मोटे लिखित ‘गुलकंद’ या चित्रपटात दोन भिन्न जोडप्यांच्या नात्यांचा प्रवास हलक्याफुलक्या पद्धतीने मांडला आहे. ‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’ व ‘वेटक्लाउड प्रॉडक्शन्स’ निर्मित ‘गुलकंद’ या फॅमकॉम चित्रपटात ढवळे आणि माने या दोन जोडप्यांच्या नात्यातील गंमतीदार क्षण, विनोदी संवाद, नोकझोक अशी मनोरंजनाची उत्तम मेजवानी पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा – लग्नाच्या पाच वर्षातच नवऱ्याचं निधन, लेक पदरात अन्…; सुरेखा कुडचींनी स्वतःला कसं सावरलं?, सांगितला ‘तो’ काळ
‘गुलकंद’ या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांसारख्या तगड्या कलाकारांचा समावेश या चित्रपटात आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १ मेपासून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.