Makarand Anaspure : मराठी चित्रपटसृष्टीतील असे बरेच कलाकार आहेत जे त्यांच्या खास शैलीमुळे प्रेक्षकांची मन जिंकतात. आपल्या सहज अभिनयाने कलाकृतीला न्याय देण्यात ही कलाकार मंडळी कुठेही कमी पडत नाहीत. त्यामुळे अशा कलाकारांचा आणि त्यांच्या कलेचा वेगळा असा चाहतावर्ग असतो. अशा कलाकारांपैकी एक अभिनेते म्हणजे मकरंद अनासपुरे. मराठी चित्रपट, नाटकांच्या माध्यमातून अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी स्वत:च्याअभिनयाची छाप प्रेक्षकवर्गावर निर्माण केली आहे. ‘खबरदार’, ‘कापूस कोंड्याची गोष्ट’, ‘आमच्या सारखे आम्हीच’, ‘सरकारनामा’, ‘सातच्या आत घरात’, ‘सावरखेड : एक गाव’, ‘शुभमंगल सावधान’, ‘वास्तव’, अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या लेकासह हजेरी लावली होती त्यामुळे ते चर्चेत आले.
मकरंद अनासपुरे यांची लेकासह हजेरी
शेलार मामा फाऊंडेशन ‘चिरायु’ हा कार्यक्रम गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मकरंद अनासपुरे यांनी लेकासह हजेरी लावली होती. यावेळी वडिलांबरोबर कार्यक्रमांमध्ये येतो तेव्हा तुला कसं वाटतं असा प्रश्न मकरंद यांच्या मुलाला विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, “मला खूप भारी वाटतं. टीव्हीवर ज्या कलाकारांना पाहतो त्यांना भेटायला मिळतं. तसं तर मी बाबांबरोबर फार कार्यक्रमांना येत नाही. आता कुठे त्यांच्याबरोबर यायला सुरुवात केली आहे. खूप मजा येते”.
बाबांच्या भूमिकेबाबत लेकाचं भाष्य…
बाबांची कोणती भूमिका तुला सगळ्यात जास्त आवडते? असा प्रश्न विचारताच मुलाने मकरंद यांचं कौतुक केलं. तो म्हणाला, ‘दे धक्का’ मधील त्यांची भूमिका मला खूप आवडते. मला हे क्षेत्र आवडतं. पण याच क्षेत्रामधून पुढे करिअर करेन इतकीही आवड नाही.
मुलाच्या कामाबाबत मकरंद अनासपुरेंच भाष्य…
मुलाने या क्षेत्रात काम करावं अशी इच्छा आहे का?, असा प्रश्न मकरंद यांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, “जे काही तो भविष्यात करेल ते त्याने चांगलं करावं. याच सदिच्छा मी देऊ शकतो. तो जी गोष्ट निवडेल त्यासाठी मी त्याला कायमच पाठिंबा देईन. मी त्याच्यावर कोणतीच गोष्ट लादणार नाही. कारण माझा तो स्वभावच नाही”. पुढे मकरंद म्हणाले, “मी आणि माझा मुलगा दोघंही सुर्यनमस्कार, बैठकांचा व्यायाम करतो. हा व्यायाम दिवसागणिक वाढावा असं मला वाटतं. फुटबॉल तो खळतो. त्याची त्याला आवड आहे. शिवाय तलवारबाजीचं प्रशिक्षण तो घेत आहे. तर हे सगळं जोरदार व्हावं अशी माझी इच्छा आहे”.