Kunal Kamra News : समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेन्ट’ या शोमध्ये रणवीर अलाहबादियाने केलेलं अश्लील वक्तव्य चर्चेत आलं. आणि त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. हा वाद इतका चिघळला की त्यावरुन रणवीर अलाहबादियाला नेटकऱ्यांनी चांगलंच धारेवर धरलं. या वादानंतर त्याने जाहीर माफी मागत हे प्रकरण मिटवण्याचाही बराच प्रयत्न केला. मात्र, आता सुप्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामराही वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं तयार केल्याने कुणाल कामरा भलताच चर्चेत आला. एकनाथ शिंदे यांचं थेट नाव घेत त्याने या गाण्यात त्यांना गद्दार असे संबोधले. हे ऐकून शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी कुणालला माफी मागण्यास सांगितले. मात्र, कुणालने या प्रकरणात त्याची चूक नसल्याचे म्हणत माफी मागण्यास नकार दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुणाल कामराने केलेलं वक्तव्य योग्य नसल्याचं म्हणत कारवाईचा इशारा केला. अधिवेशनातही कुणाल कामराचा विषय बराच गाजला. दरम्यान ठाकरे गटाने कुणाल कामराला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का? असा सवाल करत पाठिंबा दर्शवला. पोलिसांकडून दोनदा समन्स पाठवण्यात आले तरीही कुणाल कामरा चौकशीसाठी काही हजर झाला नाही. यादरम्यान आता कुणालने लोकशाही पद्धती एखाद्या कलाकाराची कशी हत्या करत आहे याबाबत खास पोस्ट शेअर केली आहे.
सुप्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामराने नेमकं पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?
“लोकशाही पद्धतीने एखाद्या कलाकाराची क्रमा-क्रमाने कशी हत्या करायची?.
१) संताप अशा पद्धतीने आणि इतका प्रचंड व्यक्त करायचा की तो अनेक ब्रँडसह काम करताना अडचण झाली पाहिजे.
२) त्यानंतर संताप आणि निषेधाचं प्रमाण आणखी वाढवायचं जेणेकरुन संस्थात्मक किंवा व्यक्तीगत कार्यक्रम करण्याआधी कलाकाराला दहावेळा तरी विचार करावा लागेल.
How to kill an Artist “Democratically” pic.twitter.com/9ESc9MZfWr
— Kunal Kamra (@kunalkamra88) April 1, 2025
३) संतापाचं आणि निषेधाचं, आरडा ओरडा करण्याचं प्रमाण इतकं वाढवा की मोठमोठे हॉटेल्स, स्टुडिओ तुमचा कार्यक्रम घेण्याची रिस्क घेणार नाहीत.
४) संतापाला आता हिंसेचं रुप द्या, म्हणजे छोट्या छोट्या जागा, स्टुडिओ हेदेखील दहशतीने त्यांची दारं बंद करतील.
५) स्टँड अप कॉमेडीसाठी उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांना समन्स धाडा, असं केल्याने कलाकाराचा मंच हा एखादा क्राईम सीन होऊन जाईल.
हे सगळं करुन कलाकाराकडे फक्त दोन पर्याय उरतात. पहिला पर्याय म्हणजे आपला आत्मा विकायचा आणि त्यांच्या हातचं बाहुलं व्हायचं आणि दुसरा पर्याय शांत बसायचं. मी सांगतोय हे एखादं प्लेबुक नाही. तर राजकीय हत्यार आहे ज्यामुळे कलाकाराची लोकशाही पद्धतीने पद्धतशीर हत्या करता येते”. कुणालने केलेली ही वादग्रस्त पोस्ट आता नेमके कोणते वळण घेणार हे पाहणं रंजक ठरेल.