Aditi Dravid Engagement : गुढीपाडव्याचा शुभदिन हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हा सण प्रत्येकाच्या घरी अगदी आनंदात साजरा केला जातो. गुढीपाडव्याचा हा दिवस मराठी नवीन वर्षाची सुरुवात आहे. यामुळेच या शुभदिवशी अनेकजण चांगल्या गोष्टींचा प्रारंभ करताना दिसतात. गाड्या, नवीन घरं, एखादी महागडी वस्तू वा नात्याचा खुलासा यादिवशी केला जातो. विशेषतः अनेक कलाकार मंडळी नवीन घर, गाड्या घेतल्याची आनंदाची बातमी या शुभदिनी देतात. तर काहीजण त्यांच्या नात्याचा खुलासा सोशल मीडियावर करतात. यंदाच्या या शुभदिनी अशाच मालिकाविश्वातील एका मराठमोळ्या अभिनेत्रीने चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. ही अभिनेत्री म्हणजे अदिती द्रविड. अदिती द्रविडने चाहत्यांसह एक आनंदाची बातमी देत साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात करत थेट अदितीने तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत गुडन्यूज दिली आहे. अगदी थाटामाटात आणि पारंपरिक अंदाजात अदितीचा साखरपुडा समारंभ पार पडला. साखरपुड्यातील रिंग सेरेमनीचा फोटो शेअर करत तिने हा सुखद धक्का साऱ्यांना दिला. होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा फोटो शेअर करत तिने ‘अदिती झाली मोहित’ हा सुंदर हॅशटॅग वापरला. अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव मोहित लिमये आहे. मोहितच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील बायोवरुन त्याची स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी असल्याचं समोर आलं आहे. रिंग सेरेमनीला अदितीने सुंदर असा लेहेंगा परिधान केला होता. आणि नवऱ्यासह खास फोटो पोज देत तिने हे साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले होते.
आणखी वाचा – लग्नाच्या पाच वर्षातच नवऱ्याचं निधन, लेक पदरात अन्…; सुरेखा कुडचींनी स्वतःला कसं सावरलं?, सांगितला ‘तो’ काळ
याशिवाय अदितीने पारंपरिक अंदाजातही खास फोटो पोस्ट केले आहेत. यांत लाल रंगाची साडी आणि त्यावर पारंपरिक दागिने अशा मराठमोळ्या लूकमध्ये ती खूपच खास दिसत होती. अभिनेत्रीच्या साखरपुड्याच्या फोटोंवर सध्या संपूर्ण कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अनेक कलाकार मंडळींनी आणि चाहत्यांनी कमेंट्स करत अभिनेत्रीला या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा – ‘गिरगांव शोभायात्रा २०२५’मध्ये ‘गुलकंद’ची हवा, चित्रपटातील कलाकारांना भेटण्यास चाहत्यांची तुफान गर्दी
‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये अदितीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमातील गाजलेलं ‘मंगळागौर’ गाणं अदितीने स्वत: लिहिलं आहे. या गाण्यामुळेही अदिती विशेष चर्चेत आलेली पाहायला मिळाली. साखरपुड्यानंतर आता अदिती केव्हा लगबंधनात अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.