Surekha Kudachi On Husband Death : कलाकार मंडळी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी झटत असतात. आपल्या कामामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य असावं असं कलाकाराला वाटतं. दुसऱ्याच्या आयुष्यात आनंदाचे रंग उधळताना कित्येकदा हेच कलाकार स्वतःचं दुःख विसरुन जातात. कलाकारांच्या रंगीत मुखवट्यामागे बऱ्याचदा अनेक गोष्टी दडलेल्या असतात. मग त्या आनंदी गोष्टी असो वा वाईट. कलाकार किती त्रासामधून जात असेल याची कल्पनाही आपण प्रेक्षक म्हणून करु शकत नाही. त्यातही स्त्री अभिनेत्री असेल तर तारेवरची कसरतच. घर, मुल, काम सांभळणं काही सोप्पं नव्हे. अशीच सर्वगुण संपन्न अभिनेत्री म्हणजे सुरेखा कुडची. सुरेखा यांचा खासगी आयुष्यातील प्रवास खरंच खडतर व प्रेरणादायी आहे. याबाबतच त्यांनी आता भाष्य केलं. आहे.
नवऱ्याला गमावण्याचं दुःख, लेक तीन वर्षांची असताना…
‘दिल के करीब’ या शोमध्ये सुरेखा यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबाबत बरेच खुलासे केले. अगदी कमी वयात पतीला गमावणं, एकटीने मुलीचा सांभाळणं करणं खरंच सोप्पं नव्हतं. पण सुरेखा हिंमतीने उभ्या राहिल्या. जमेल तितकी मेहनत करत काम केलं आणि अजूनही करतात. याचबाबत त्या म्हणाल्या, “माझं लग्न २००८मध्ये झालं. २०१३मध्ये गिरीशचं (पती) निधन झालं. या पाच-सहा वर्षाच्या काळात आम्ही खूप कमी वेळ एकत्र होतो. त्याचं काम कोल्हापूरमध्येच सुरु असायचं. मला अचानक मुंबईमध्ये खूप कामं मिळत गेली. त्यामुळे पाच-साडेपाच वर्षांत आम्ही किती वेळ एकत्र होतो तेच आठवत नाही. मी हे सगळं स्वीकारलं आहे त्यामुळे काम करावंच लागणार”.
“आजही मी जेव्हा घरी जाते तेव्हा माझ्या ताटातला घास मुलीला भरवते मला वेगळाच आनंद मिळतो. आई म्हणून मी तिला अजिबात वेळच देऊ शकले नाही. माझ्या मुलीने मला समजून घेतलं. कामासाठी आईला लांब राहावं लागतं हे तिला कळालं. काम नाही केलं तर पैसे नाही मिळणार, मॉलमध्ये गेलो तर काही घेता येणार नाही हे तिला मी समजावून सांगायचे. मी टीव्हीमध्ये दिसले की, मम्मा मम्मा म्हणत ती टीव्हीवर हात मारायचे. लोकांना फक्त आपलं ग्लॅमर दिसत असतं. पण आपण किती त्रासातून जात असतो हे लोकांपर्यंत पोहोचत नाही”.
लेकीचा एकटीने सांभाळ करताना…
एकटीनेच मुलीचा सांभाळ करण्याबाबत सुरेखा म्हणाल्या, “माझ्याकडे नवरा गेल्यानंतर काहीच पर्याय नव्हता. दोन फ्लॅट घेतले होते. लोन होतं. मुलगी तीन-चार वर्षांची होती. त्यामुळे तिचं शिक्षण मला दिसत होतं. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून अमूक अमूक शाळेत मुलीला प्रवेश घेऊ शकत नाही हे मला करायचं नव्हतं. मला पर्यायच नव्हता. गिरीश गेल्या गेल्या मला घरच्यांनी समजावलं होतं की, तू दुसरं लग्न कर. ती लहान आहे. तोपर्यंत कर लग्न. कारण मुलगी मोठी झाली की तुझं लग्न बहुदा ती मान्य करणार नाही. पण तेव्हा मी त्या मनस्थितीमध्ये नव्हते. माझं असं होतं की कामंच करु. माझं असं झालं (पतीचं निधन) इंडस्ट्रीतील बऱ्याच लोकांनी मला फोन केले. काही लागलं तर सांग आम्ही आहोत. त्यावर मी इतकंच म्हणायचे की, मला काही नको फक्त काम द्या. दुसरी मी काय मदत मागणार”. प्रत्येक महिलेने सुरेखा यांच्याकडून सकारात्मक गोष्ट शिकावी. यामुळे आयुष्य आणखी सुखकर होण्यास नक्कीच मदत होईल.