मराठीमध्ये सध्या नव्या विषयांवर आधारित चित्रपट येऊ घातले आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘देवमाणूस’. रेणूका शहाणे व महेश मांजरेकरांची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला. अवघ्या काही तासांमध्येच ट्रेलरला लाखो व्ह्युज मिळाले. उत्कंठता वाढवणारी या चित्रपटाची कथा असल्याचं ट्रेलरवरुन लक्षात येतं. आता या चित्रपटाला बॉलिवूडकडूनही जोरदार प्रतिसाद मिळत आहे. बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी ‘देवमाणूस’चा ट्रेलर सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करत चित्रपटाचं कौतुक केलं आहे. (Devmanus Marathi Movie)
बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणलाही या ट्रेलरने भुरळ घातली आहे. त्याचबरोबरीने राजकुमार राव, अर्जुन कपूरनेही तोंडभरुन या चित्रपटाचं कौतुक केलं. लव फिल्म्स प्रस्तुत ‘देवमाणूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी निर्मिती केली आहे. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
ट्रेलरमध्ये ‘देवमाणूस’च्या रहस्यपूर्ण, गूढ आणि भावनिक कथानकाचं दर्शन घडतं. दमदार अभिनय, क्षणाक्षणांमध्ये बदलणारे भाव, थरार ट्रेलरमध्ये आहे. त्यामुळे हा चित्रपट एक सिनेमॅटिक दृष्ट्या उत्तम ठरणार असल्याचं चित्र दिसतंय. शिवाय ‘देवमाणूस’ची झलक पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली आहे.
आणखी वाचा – प्रेम, अफेअर अन् कौटुंबिक गोडवा; ‘गुलकंद’चा धमाकेदार ट्रेलर, सई ताम्हणकर-समीर चौघुलेची धमाल
मराठीमधील दमदार कथा, खूप दिवसांनी असा ट्रेलर पाहिला, कथा मनोरंजनात्मक असणार अशा विविध भावना प्रेक्षक सोशल मीडियाद्वारे व्यक्त करत आहेत. तसेच महेश मांजरेकर व रेणूक शहाणे यांची नवी जोडी म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. तर पोलिसांच्या लूकमधील सुबोध भावेही विशेष लक्ष वेधून घेत आहे. २५ एप्रिलला ‘देवमाणूस’ चित्रपटगृहांमध्ये दाखल होईल.