मुंबईत घराच्या किंमतीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मुंबईत घर घेणे अशक्य झालं आहे. यासाठी सर्वसामान्य नागरिकांना सिडकोसह म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची वाट पाहत असतात. त्यामुळे दरवर्षी म्हाडाकडून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घर मिळण्यासाठी विविध भागात घरे उपलब्ध करुन दिली जातात. काही दिवसांपूर्वी म्हाडा मुंबईत तब्बल २०३० घरांची लॉटरी काढणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याबाबत म्हाडाकडून आता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून अर्ज प्रक्रियादेखील सुरु करण्यात आली आहे.
या लॉटरीमध्ये सामान्य नगरीकांसह अनेक कलाकार मंडळीही अर्ज करतात. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार मंडळींसाठी म्हाडाच्या घरांचा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे प्रत्येक सोडतीत कलाकार प्रवर्गात मोठ्या संख्येने कलाकार अर्ज करतात. मात्र या कलाकार प्रवर्गात लेखकांना स्थान नसल्याचे समोर आले आहे. मराठी नाटक, टीव्ही मालिका लिहिणाऱ्या एका लेखकाने म्हाडाच्या सोडतीत ‘कलाकार’ कोट्यातून अर्ज केला, त्याला घरही लागले. मात्र पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले ‘कलाकार’ असल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्याने सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे विनंती केली असता, ‘लेखक हे कलाकार नाहीत’ असे धक्कादायक उत्तर त्यांना मिळाले.
या मुद्द्यावरून मराठी मनोरंजनसृष्टीत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अशातच मराठी व हिंदी चित्रपट दिग्दर्शक समीर विद्वांसने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “म्हाडा सोडतीत लेखकांना स्थान नाही” या मथल्याची बातमी समीरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केली असून या बातमीबद्दल त्याने तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “बरोबरच आहे, लेखक कलाकार नाहीतच. सगळे दिग्दर्शक व अभिनेते स्वयंभूच आहेत. स्टेजवर, स्क्रीनवर येऊन ते बाराखडी आणि पाढेच म्हणतात”.
यापुढे त्याने “लेखन ही कला थोडीच आहे?” असा प्रश्न करत “किराणा मालाची यादी आणि संहीता यात काही फरक नाही. अच्छा ते स्टेजवर भाषण देणाऱ्या नेत्यांना अधिकृत कलाकार मानायचं का आता?” असा प्रश्नही उपस्थित केला आहे. तसंच अभिनेता शशांक केतकरनेदेखील यावर “सरकारी जाहिराती लिहायला लेखक लागतातचं ना?” असं म्हटलं आहे. दरम्यान, लेखक व दिग्दर्शक असण्याबरोबरच समीर हा अनेकदा सामाजिक व राजकीय परिस्थितीवर भाष्य करत असतो. तसंच शशांकदेखील अनेकदा व्यक्त होताना दिसतो. अशातच त्यांनी म्हाडाच्या घरांच्या सोडतीत लेखकांना स्थान नसल्याबद्दलही भाष्य केलं आहे. यातून काही थेट प्रश्नही उपस्थित केले आहेत.