Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाला दणक्यात सुरुवात झाली असून या शोचा आजचा तेरावा दिवस आहे. हा शो हळहळू प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या नवीन पर्वाची सुरुवातच भांडणांनी व वादांनी झाली. निक्की व वर्षाताईंमधले राडे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. यानंतर रितेशने निक्कीला सुनावत माफीही मागायला लावली. मात्र घरात पहिल्या दिवसापासून घरातील स्पर्धकांमध्ये वादावादी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. एकामागून एक स्पर्धक वाद घालत आहेत. घरातील वाद जसे चर्चेत आहेत, तसच घरातील प्रेमकहाण्यादेखील चर्चेत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात शुक्रवारी टीव्ही टास्क पार पडला. (Bigg Boss Marathi 5 Update)
‘बिग बॉस’ टीव्ही चॅनलवर घरातील सदस्य धमाकेदार परफॉर्मन्स सादर करताना दिसले. घन:श्याम हे सर्व परफॉर्मन्सचं परिक्षण करताना दिसले. त्यामुळे कालचा भाग खूपच रंजक झाला. त्यामुळे प्रेक्षकांकडूनही हा शो मोठ्या प्रमाणात पाहिला गेला. आतापर्यंतच्या पर्वातील सर्वात मोठी सीझन ओपनिंग ही कालच्या भागाची झाली. यानिमित्त रितेशने सर्वांचे आभार मानले आहेत. रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टमध्ये २.४ TVR रेटिंग आलं आहे. TVR हे टेलिव्हिजन रेटिंगचे एक प्रेक्षक मोजमाप आहे. हे टीव्ही कार्यक्रम पाहणाऱ्या मूळ लोकसंख्येची टक्केवारी दर्शवते. TVR हा एखादा प्रदेश किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये असलेला लक्ष्य प्रेक्षक असतो.
याचनिमित्त रितेशची पत्नी जिनिलीयाने रितेशचे कौतुक केलं आहे. जिनिलीयाने रितेशसाठी पोस्ट शेअर केली असून “हे खूपच भारी आहे. प्रिय नवरा मला तुझा खूप अभिमान आहे” असं म्हणत त्याचे कौतुक केलं आहे. तसंच याबरोबर तिने “रोज रात्री ९ वाजता माझ्यासाठी फक्त बिग बॉस मराठी” असंही म्हटलं आहे. रितेश-जिनिलीया ही जोडी मराठी मनोरंजन क्षेत्रासह हिंदी मनोरंजन क्षेत्रातीलही एक लोकप्रिय जोडी आहे. हे दोघं कायम एकमेकांना त्यांच्या कामासाठी पाठींबा देत असतात. तसंच एकमेकांच्या कामाचं कौतुकही करत असतात.
अशातच जिनिलीयाने रितेशच्या बिग बॉस मराठीच्या पहिल्या होस्टिंगनिमित्त कौतुक केलं आहे. गेल्या आठडव्यात रितेशने केलेल्या होस्टिंगचं प्रेक्षकांकडून कौतुक करण्यात आलं होतं. गेल्या आठडव्यात त्याने घरातील स्पर्धकांचा चांगलाच समाचार घेतला होता. अशातच आता येत्या आठडव्यात तो काय बोलणार? याकडे चाहत्यांचे लक्षलागून राहिलं आहे.