अभिनेत्री सुश्मिता सेन अभिनित ‘ताली’ या वेबसीरिजचं जगभरात कौतुक होत आहे. तृतीयपंथींच्या हक्कासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणाऱ्या गौरी सावंत यांच्यावर आधारित ही वेबसीरिज आहे. या हिंदी वेबसीरिजमध्ये मराठी कलाकार भाव खाऊन गेले, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मराठमोळे दिग्दर्शक रवी जाधव यांनी या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा पेलवली. तर या वेबसीरिजच्या लिखाणाची जबाबदारी क्षितिज पटवर्धन याने सांभाळली. इतकंच नव्हे तर मराठमोळ्या कलाकारांनी केलेला अभिनय मराठी सिनेसृष्टीचा नाव उंचावत आहे. (Ravi Jadhav On Hemangi Kavi)
अभिनेता सुव्रत जोशी, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, कृतिका देव, हेमांगी कवी या कलाकारांनी या वेबसीरिजमध्ये उत्तम भूमिका केल्या. या प्रत्येक कलाकाराच्या भूमिकेचं कौतुक होताना दिसतंय. स्क्रीन टाइम कमी असला तरी या वेबसीरिजमधील हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत राहिली. अशातच दिग्दर्शक रवी जाधव यांनी हेमांगी कवीचं कौतुक करणारी एक स्पेशल पोस्ट इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे.
ताली’ या वेबसीरिजमध्ये हेमांगी कवी हिने सायली हे पात्र साकारलं आहे. यात ती गौरी सावंत यांच्या बहिणीचे पात्र साकारताना दिसली. रवी जाधव यांनी हेमांगी कवीच्या भूमिकेचं कौतुक करत खास कॅप्शन दिले आहे. यांत त्यांनी म्हटलं आहे की, “हेमांगी कवी आमच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सची विद्यार्थीनी. तिने अभिनय केलेल्या ‘धुडगूस’ या सुंदर चित्रपटाची जाहिरात मी केली होती परंतु एकत्र काम पहिल्यांदाच ‘ताली’ मध्ये केले. छोटीशी व्यक्तीरेखा असुनही तीने ती ज्या ताकदीने साकारली आहे की जी प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील!!!”.
रवी जाधव यांनी कौतुकास्पद शेअर केलेल्या व्हिडिओवर हेमांगी कवीने प्रतिक्रिया दिली आहे. “खूप खूप धन्यवाद, सिनीअर” असे म्हणत हेमांगीने कमेंट केली आहे.