दिग्दर्शक नागराज मंजुळे मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांचे नेहमीच लक्ष लागलेले असते. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘फॅन्ड्री’, ‘नाळ’, ‘सैराट’ या चित्रपटांचे खूप कौतुक झाले. त्यांनी आपल्या कारकीर्दीने आजवर अनेक पुरस्कार कमावले आहेत. अशातच आता त्यांना नुकताच एक आणखी पुरस्कार मिळाला आहे. महात्मा फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरुवारी फुले वाडा येथील समता भूमी येथे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. (Nagraj Manjule Jyotiba Award)
नागराज मंजुळे यांना समता परिषद या संस्थेतर्फे २०२४ सालचा महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते नागराज मंजुळे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. या बातमीने चाहत्यांना आनंद झाला आहे आणि यानिमित्त त्यांनी खास सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली आहे. नागराज मंजुळे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पुरस्कार सोहळ्यामधील काही खास क्षण शेअर केले आहेत आणि आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
नागराज यांनी हे खास फोटो पोस्ट करत असं म्हटलं आहे की, “अकरावी-बारावीत असताना मी ज्योतिबा फुलेंचं रेखाचित्र काढलं होतं. त्यांच्या विचारांचं बोट पकडून प्रवास नुकताच सुरु केला होता. आज त्यांच्याच नावानं पुरस्कार मिळवा ही अत्यंत आनंदाची आणि सार्थकतेची गोष्ट आहे. कृतज्ञ”. त्यांच्या या पोस्टवर अभिनेता सिद्धार्थ जाधव, उत्कर्ष शिंदे यांनी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांच्या अनेक चाहत्यांनीही नागराज मंजुळे यांना “अभिनंदन”, “शुभेच्छा” व “अभिमान आहे” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट घेऊन येणारे नागराज मंजुळे आता ओटीटी विश्वात एक रंजक सीरिज घेऊन येत आहेत. लवकरच त्यांची ‘मटका किंग’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये सई ताम्हणकर व सिद्धार्थ जाधव हे कलाकारही पाहायला मिळणार आहेत. तसंच त्यांचा ‘खाशाबा’ आगामी सचित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.