यंदा सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळतेय. सगळेच बांधव गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करताना दिसत आहेत. सर्वसामान्यांपासून कलाकार मंडळी तसेच नेते मंडळींकडे बाप्पाचे आगमन झाले होते. अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. यंदाचा त्यांचा गणेशोत्सव सिने तारकांच्या उपस्थितीने उजळून निघाला.
मुख्यमंत्र्यांच्या मलबार हिल येथील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी सर्व बॉलिवूड कलाकार पारंपरिक पोशाखात दाखल झाले होते. पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ११ दिवसांचा गणपती सार्वजनिकरित्या साजरा करण्यात आला आहे. अनेक बॉलिवूड सिनेतारकांनी मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचे दर्शन घेतले. या पाठोपाठ बाप्पाच्या दर्शनासाठी मराठी कलाकारांनाही आमंत्रित करण्यात आले होते. (Eknath Shinde On Ganeshotsav)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे खूप मोठे चाहते आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी मराठी कलाकारांना आमंत्रित केलं होतं. काल संपूर्ण मराठी सिनेसृष्टीने मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ बंगला उजळून निघाला होता. मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली होती. शिवाय अभिनेता स्वप्नील जोशी, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, सुशांत शेलार, अक्षय वाघमारे, मृण्मयी देशपांडे, हेमांगी कवी, सुप्रिया पाठारे यांसारख्या अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली.

मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर सर्व कलाकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एकत्र येत बाप्पासमोर फोटो, व्हिडीओ काढले. दरम्यान कलाकारांनी एकत्र “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय” असं म्हणत बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे. तर बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, तमन्ना भाटिया, श्रद्धा कपूर यांसारख्या कलाकारांनी देखील बाप्पाचे दर्शन घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.