मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेविश्वालादेखील आपल्या अभिनयाने वेड लावणारा लयभारी अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. आजवर अनेक मराठी व हिंदी चित्रपटांत काम केल्यानंतर रितेश देशमुख लवकरच ओटीटीद्वारेही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेश देशमुख ‘पिल’ या वेबसिरीजद्वारे ओटीटीवर पदार्पण करणार आहे. या मालिकेत रितेश देशमुख एका फार्मा कंपनीचे डेप्युटी मेडिसिन कंट्रोलर प्रकाश चौहानची भूमिका साकारताना दिसणार आहे. आपल्या सीरिजमधून रितेश देशमुख एका गंभीर भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
यानिमित्त रितेशने ‘टीव्ही 9 हिंदी’ला दिलेल्या मुलाखतीत भूमिकांच्या निवडीबद्दल भाष्य केलं आहे. आपल्या भूमिकेबद्दल रितेशने असं म्हटलं आहे की, “मी सहसा अशा भूमिका साकारणं टाळतो, जिथे मला शिवीगाळ करावी लागेल. एखाद्या भूमिकेची गरज म्हणून त्यात तसे संवाद असले तरीही मी ते करणार नाही. कदाचित पुढे जाऊन मी त्यावर पुन्हा विचार करेन. पण सध्या तरी मी अशा भूमिका साकारणं टाळतो. भविष्यातही अशा उग्र भूमिका पडद्यावर साकारणं मी टाळेन. कोणत्या प्रकारचे चित्रपट करायचे असा प्रश्न असे तर त्यासाठी माझी काही विशेष मापदंडं नाहीत. त्या त्या वेळेनुसार माझे विचार बदलत जातात”.
यापुढे रितेश असं म्हणाला की, “मी आजपर्यंत कोणतेही अपमानास्पद पात्र साकारलेले नाही. कारण मला असे वाटले नाही की, मला ऑफर केलेल्या पात्रांसाठी गैरवर्तन करणे आवश्यक आहे. पण भविष्यात ही विचारसरणी बदलू शकते. सध्या मला असे चित्रपट करायचे आहेत ज्यांची कथा माझ्या हृदयाला भिडेल आणि कथा ऐकल्यानंतर मला त्याचा हेवा वाटेल. मला खूप मजा आली. मग मी तो चित्रपट करण्यास होकारार्थी म्हणेन”.
दरम्यान, रितेश देशमुखची ‘पिल’ ही वेब सीरिज १२ जुलैपासून जिओ सिनेमा या ओटीटी माध्यमावर स्ट्रीम होणार आहे. या वेब सीरिजमध्ये रितेश देशमुखशिवाय, पवन मल्होत्रा, अंशूल चौहान, राजकुमार गुप्ता, अक्षत चौहान आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. रॉनी स्क्रूवाला यांनी या वेब सीरिजची निर्मिती केली आहे.