बाप मुलीचं नातं या नात्याची तुलना आपण जगातील इतर कोणत्याही नात्याबरोबर करू शकत नाही. बाप मुलीचा हळव्या नात्यावर भाष्य करत एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील बाबाची जागा आणि बाबा गेल्यानंतर त्याची कळालेली किंमत यावर भाष्य करत भावुक झाली. ही अभिनेत्री म्हणजे मराठमोळी अभिनेत्री सुरभी भावे. सुरभी भावेने नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या बाबांबरोबर असलेल्या केमिस्ट्रीबाबत भाष्य केलं. बाबांबद्दल बोलताना सुरभी भावुक झालेली पाहायला मिळाली. (Surabhi Bhave On Her Father)
सुरभीने तिच्या बाबांबरोबरची आठवण शेअर करत म्हटलं, “बाबा माझा जगात भारी होता. आणि आमची केमिस्ट्रीही खूप स्पेशल होती. आम्ही दोघे जिवलग मित्र होतो. आणि ते अचानक गेले. आणि ते पचवायला मला खूप वेळ गेला. त्यावेळी अवघ्या पंधरा वर्षाची होते. तेव्हा मी दहावीत होते. त्यावेळी मी पंधरा वर्षाची असताना चाळिशीतली भूमिका साकारत होते. मला माझ्या आयुष्यात आलेलं पहिलं लव्हलेटर मी माझ्या बाबांच्या शेजारी बसून वाचलं. तेव्हा माझ्या बाबांच्या डोळ्यात पाणी आलं, आणि आईला म्हणाले की, तनुजा आपली मुलगी मोठी झाली गं”.
“बाबा मला नेहमी सांगायचे, ताई तुझं लग्न झालं की, मी छोट्याश्या खोलीत राहणार, पण माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोरचं राहणार. आणि असं म्हणणारा माणूस स्वतःच पटकन निघून जातो, हे सहन नाही झालं. जर मी माझ्या बाबांचा लॉस स्वीकारू शकते तर मी जगात कोणाताही लॉस स्वीकारू शकते. आजपर्यंत मी अनेक गोष्टींना सामोरे गेले आहे पण मी कधीच डगमगले नाही. कारण माझे बाबा मला सोडून गेले आहेत तर त्यांना कधीच माझी लाज वाटायला नको की, मी हिला सोडून गेलो आहे आणि हिने काय केलं. माझे वडील गेले तेव्हा माझी आई बत्तीस तेहतीस वर्षांची होती. माझ्याही पेक्षा ती वयाने तेव्हा लहान होती आणि पदरी दोन मुलं होती. तेव्हा जे टुरिस्ट यायचे त्यांना जेवण करून वाढायचं हा व्यवसाय ती बाबा गेल्यानंतर करू लागली”.
“मी खूप भाग्यवान आहे की,माझी दोन्ही कुटुंब कमाल आहेत. तेव्हा मी, माझी आई, भाऊ आणि माझी आजी त्या कोकणातल्या म्हणजे गुहागरमध्ये आमचं घर होतं तिथे राहत होतो. कोकणातला पाऊस भयंकर वाटतो. आणि मग एका क्षणाला असं जाणवलं की, आपल्याला सुरक्षित ठेवणार कोणी नाही आहे. आणि मग असं झालं की, आपल्यावर आता तो हात नाही आहे. एकदा तर असं झालं की, ते मला जाताना दिसले. आणि मी त्यांच्या मागे पळत होते. बरेचदा ते माझ्या स्वप्नात यायचे आणि सांगायचे की, मी कायम तुझ्याबरोबर आहे. तीन महिन्यांपूर्वी ते माझ्या स्वप्नांत आले होते. आणि म्हणाले, मला तुझा अभिमान आहे. माझं असं झालं की, माझ्या लेकीला तुम्हाला पाहता नाही आलं”.
“माझ्या बाबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मला आधीपासूनच त्यांची किंमत होती पण माणूस गेल्यानंतर त्यांची अधिक किंमत कळते. बाबांना मी प्रत्येक क्षणाला मिस करतेय. सान्वी झाल्यावर असं झालं की, मी मनातल्या मनात बाबांबरोबर बोलायचे की, बाबा बघितलं का तुम्हाला नाथ झाली. आता सिद्धार्थ व सान्वीच बॉण्डिंग पाहिलं की, मला अजून जास्त भावुक व्हायला होतं. आई नको बाबा हवा असं जेव्हा सान्वी बोलली तेव्हा मलापण जाणवलं की, मला पण बाबा हवा आहे. ज्याला मी आता कडकडून मिठी मारेन आणि सांगेन मी आता थकले”, असं म्हणून सुरभीला अश्रू अनावर झाले”.