छोटा व मोठा पडदा गाजवत अभिनेत्री सुकन्या मोने यांनी स्वतःच असं महत्त्वाचं स्थान सिनेसृष्टीत निर्माण केलं. आजवर सुकन्या यांनी हिंदी, मराठी सिनेसृष्टीत बरंच काम केलं आहे. अभिनयासह त्यांना नृत्याचीही प्रचंड आवड आहे. सुकन्या यांनी वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. अपघात, आजारपण, प्रचंड कठीण परिस्थितीला सामोरं गेल्यानंतर झालेला मुलीचा जन्म हे सगळंच. सुकन्या यांच्याबरोबर त्यांच्या लेकही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. (Sukanya Mone Incident)
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील सुकन्या मोने यांच्या भूमिकेचं भरभरुन कौतुक झालं. या चित्रपटात ज्युलियानेही एक भूमिका केली होती. त्यामुळे तीदेखील चर्चेत आली. सुकन्या मोने सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत असतात. विशेषतः त्या स्वामीभक्त असून स्वामींचे अनेक व्हिडीओही त्या शेअर करत असतात. अशातच सुकन्या यांनी ‘मिरची मराठी’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलतानाही त्यांनी स्वामींच्या प्रचितीचा एक किस्सा सांगितला.
यावेळी बोलताना सुकन्या म्हणाल्या, “जुलियाच्या कॉलेजच्या ऍडमिशनच्या वेळेला तिला सोफिया कॉलेजला जायचं होतं. संजयचं म्हणणं होतं की, घराजवळ असलेल्या रुईया कॉलेजला ऍडमिशन घे. रुईयामध्ये बऱ्यापैकी ओळखी आहेत. म्हणून तो असं म्हणत होता. यावर ज्युलियाचं म्हणणं होतं की, म्हणूनचं तिला या कॉलेजमध्ये जायचं नव्हतं. तिला एक्स्प्लोर करायचं होतं आणि म्हणून तिला वेगळ्या ठिकाणी जायचं होतं. तीन वाजता ऍडमिशन बंद होणार होतं. शेवटी पावणेतीन वाजता संजय म्हणाला तू घे ऍडमिशन. यावर म्हणाले, आता काय उपयोग आहे तीन वाजता ऍडमिशन बंद होणार आहे. तरी मी ज्युलियाला म्हटलं चल”.
पुढे त्या म्हणाल्या, “आमचे ड्रॉयव्हर दादा चंदनला म्हटलं, गाडी काढ. यावर तो म्हणाला, मॅडम आपण कितीही फास्ट गेलो तरी तेव्हढ्या वेळात आपण पोहचू शकणार नाहीत. तरी मी त्याला म्हटलं तू चल. आम्ही निघताना मी स्वामींना प्रार्थना केली, पहिल्यांदा माझ्या लेकीने हट्ट केला आहे, मला माहित नाही तो पूर्ण करा. माझा मंत्र सुरु होता. धावत धावत गेलो. ज्युलियाला म्हटलं काय तो १० रुपयाचा फॉर्म आहे तो घे आणि तू पळ. ती वर उभी होती. आम्हाला पळताना बघून ती म्हणाली, सावकाश या सावकाश या सर्व्हर डाऊन आहे. आम्ही ३.२६ला तिथे पोचलो. आणि पावणेचार वाजता सर्व्हर सुरु झाले आणि ज्युलियाचं ऍडमिशन झालं”.