Marathi actress Bike Accident : कलाकार हा अभिनयाशी एकनिष्ठ असतो. असे हाडामासांचे अनेक कलाकार आहेत जे अभिनयाला प्राधान्य देत मनोरंजन करतात. नुकतंच याचं ताजं उदाहरण म्हणजे अमोल बावडेकर. मराठी अभिनेते अमोल बावडेकर यांना नाटकाच्या प्रयोगाआधी हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग रद्द कऱण्यात आला. नाटकाचा हा प्रयोग रद्द होऊ नये म्हणून अभिनेत्याने अँजिओप्लास्टीनंतर डॉक्टरांकडे प्रयोगासाठी तीन तास मागितले. प्रकृती गंभीर असताना अभिनेत्याने नाटक करण्याची दाखवलेली तयारी पाहून त्याचे अभिनयाप्रती असलेलं प्रेम दिसलं. यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने कठीण परिस्थितीतही ‘द शो मस्ट गो ऑन’ म्हणत सगळ्यांचं मन जिंकलं आहे.
‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकात काम करणाऱ्या शलाका पवारवर एक मोठा प्रसंग ओढवला आहे. शलाका दादर ते ठाणे या मार्गावर दुचाकीवरुन प्रवास करत होत्या. यावेळी प्रवासादरम्यान महानगरपालिकेची कचरा गोळा करणारी गाडी तिच्या पुढे होती. त्या गाडीतून जड लोखंडी वस्तू घरंगळत आली आणि ती वस्तू थेट अभिनेत्री शलाका पवार यांच्या पायावर आदळली. लोखंडी वस्तू पायाला घासल्यामुळे गंभीर दुखापत झाली त्यामुळे अभिनेत्री तात्काळ विक्रोळीतील जवळच्या रुग्णालयात पोहोचली. या अपघातामुळे त्यांच्या पायाला १८ टाके पडले.
पायाला टाके असताना समोर नाटकाचे प्रयोग नियोजित असल्याचे लक्षात घेत शलाका यांनी आरामाऐवजी नाटकांच्या प्रयोगाला प्राधान्य दिलं. पायाला टाके, बँडेज घेऊन त्यांनी सलग तीन दिवस त्यांनी नाटकाचे प्रयोग केले. सहकलाकारांनीही वेळोवेळी त्यांची काळजी घेतली. त्यांना सांभाळून घेतलं. पण, तीन प्रयोग झाल्यानंतर घडायचं नव्हतं ते घडलंच. टाके सुटले. मग पुन्हा डॉक्टरांकडे जाऊन बँडेज करावे लागले. ३ प्रयोग पार पडल्यावर ५ दिवसांच्या ब्रेकनंतर त्यांना बराच आराम मिळाला आहे. २१ जूनच्या प्रयोगासाठी त्या दणक्यात पुन्हा उभ्या राहणार आहेत.
नाटकाबरोबरचा शलाका या ‘तुझी माझी जमली जोडी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. “माझ्या मालिकेच्या टीमने देखील खूप सहकार्य केलं. प्रेक्षकांशी वचनबद्ध असल्याने दुखापत असतानाही काम करताना हुरुप येतो” असं अभिनेत्रीने ‘महाराष्ट्र टाइम्स’शी संवाद साधताना सांगितलं.





