‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील ‘सोयरा बाईसाहेब’ म्हणून घराघरांत पोहोचलेली आणि करिअरच्या सुरुवातीलाच नकारात्मक भूमिका अगदी चोख वठवत प्रेक्षकांची वाहवा मिळवणारी अभिनेत्री म्हणजे स्नेहलता तावडे-वसईकर. सोयराबाई यांची भूमिका चांगल्याप्रकारे वठवून अभिनेत्री स्नेहलताने प्रेक्षकांच्या कौतुकाची पावती मिळवली आहे. आजवर अनेक मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या स्नेहलताबद्दल आता अभिनेत्री सविता मालपेकर यांनी एक मोठा खुलासा केला आहे. सविता मालपेकर यांनी स्नेहलताकडून मालिकेच्या सेटवर त्रास झाला असल्याचे म्हटलं आहे. सविता मालपेकर यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीत याविषयी भाष्य केलं आहे. (Savita Malpekar on Snehalata Tawde-Vasaikar)
यावेळी सविता मालपेकर यांनी असं म्हटलं की, “माझ्या कारकिर्दीतली पहिली मालिका असेल ज्यात मालिकेच्या सहकलाकाराने मला खूप त्रास दिला. म्हणजे मी अनेक कलाकारांबरोबर कामे केली. जुन्या आणि नवोदित कलाकारांबरोबरही कामे केली आहेत. पण कुणीही मला त्रास दिलेला नाही. पाठीमागे बोलत असतील तर त्याकडे मी कधी लक्ष दिलं नाही. स्नेहलता तावडेने मला खूप त्रास दिला. त्यावेळी काहीही आसायचं. रात्री १२ वाजता त्यावेळच्या हेड श्रावणी देवधरला फोन करुन काही सांगायची. पण एक दिवसही श्रावणीला असं वाटलं नाही की, मला समोरून विचारावं”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “मला खूप त्रास व्हायला लागला आणि मग मी एकेदिवशी रात्री सांगितलं की, जय हिंद जय महाराष्ट्र. कारण जिथे आनंद मिळत नाही तिथे पैसे मिळून तरी काय उपयोग. पैसे सर्वांनाच मिळतात. त्यासाठीच सगळे काम करतात. पण त्याचा अर्थ असं नाही की जिथे आनंद नाही मिळणार. यामुळे मी पैशांनी कमी श्रीमंत असेल, पण मी कामाचा आनंद आधी शोधते. कामाचा आनंद मिळणार असेल तर मी पैसे विचारत पण नाही”.
दरम्यान, सविता यांनी त्यांना ज्या मालिकेच्या सेटवर त्रास झाल्याचे सांगितले होते ती मालिका होती ‘दुर्गा वर्सेस सरस्वती’ ही मालिका. या मालिकेत त्यांनी लक्ष्मी नावाच्या कोळी स्त्रीची भूमिका त्यांनी साकारली होती. काही काळ काम केल्यावर त्यांनी ही मालिका सोडली आणि मालिकेच्या टीमवर अनेक आरोप केले. यामुळे हे प्रकरण खूप गाजलं होतं. अशातच आता सविता यांनी त्या प्रकरणी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे आणि स्नेहलताबद्दलही खुलासे केले आहेत.