पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ त्याच्या लाइव्ह कॉन्सर्ट ‘दिल-लुमिनाटी टूर’मुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्या कॉन्सर्टचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामधून त्याच्यावरील चाहत्यांचे प्रेम स्पष्टपणे दिसत आहे. दिल्लीनंतर या गायकाचा लाइव्ह शो आज १५ नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये होणार आहे, ज्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत. मात्र, ही कॉन्सर्ट सुरु होण्यापूर्वीच तेलंगणा सरकारने दिलजीतला नोटीस बजावली आहे. दिलजीत दोसांझचा लाइव्ह कॉन्सर्ट आज हैदराबादमध्ये होणार आहे. याआधी तेलंगणा सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. (Diljit Dosanjh Live Concert Notice)
तेलंगणा सरकारने नोटीस जारी करताना दिलजीतच्या ३ गाण्यांवर बंदी घालण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. ही नोटीस सरकारने गायक संघ आणि हॉटेल नोवोटेलला पाठवली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, दिलजीत दोसांझने हैदराबादमधील त्याच्या लाइव्ह शोदरम्यान दारू, ड्रग्स, मादक पदार्थ किंवा हिंसेला प्रोत्साहन देणारी गाणी (पंज तारा, केस आणि पटियाला पेग) गाऊ नयेत. दिलजीत दोसांझच्या विरोधात अशा गाण्यांवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या चंदीगड येथील प्राध्यापक पंडितराव धारनवार यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन तेलंगणा सरकारने हे पाऊल उचलले आहे.
नोटीसमध्ये म्हटले आहे की, “तुम्हाला तुमच्या लाइव्ह शोमध्ये याचा प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी आम्ही ही नोटीस आगाऊ जारी करत आहोत”. त्यात असेही म्हटले आहे की, “जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, प्रौढांना १४० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या दाबाला सामोरे जावे लागू नये. लहान मुलांसाठी ही पातळी १२० डेसिबलपर्यंत कमी केली जाते. त्यामुळे मुलांनी १४० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या दाबाच्या संपर्कात येऊ नये”.
दरम्यान, दिलजीत दोसांझची ‘दिल-लुमिनाटी’ कॉन्सर्ट शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता जीएमआर अरेना, एअरपोर्ट ऍप्रोच रोड, हैदराबाद येथे होणार आहे. गायक दिलजीत दोसांझ बुधवारी शहरात पोहोचला आणि सोशल मीडियावर त्याच्या शहर भटकंतीची झलकही शेअर केली.