कलर्स मराठी वाहिनीवर काही दिवसांपूर्वी आलेली ‘सुखांच्या सरीने हे मन बावरे’ या मालिकेने प्रेक्षकांची चांगलीच मनं जिंकली होती. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या मालिकेची कथा, त्यातील व्यक्तिरेखा इतकंच नव्हे तर मालिकेचं शीर्षकगीतदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. मालिकेतील सर्वांची लाडकी जोडी अनु व सिद्धार्थ म्हणजेच अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री मृणाल दुसानीस हे दोघे तर प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत बनले होते. शशांक व मृणाल यांचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहतावर्गदेखील आहे. (Sukhachya Sarini He Man Baware Rerelease)
हे मन बावरे’ मालिका २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यानंतर २०२० मध्ये या मालिकेने सर्वांचा निरोप केला. जवळपास दोन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. कलर्स मराठी वाहिनीवर ही मालिका प्रसारित केली जायची. ही मालिका संपून चार वर्षे झाली असली तरीही सिद्धार्थ-अनुच्या जोडीने प्रत्येकाच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. अशातच या मालिकेच्या अनेक चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे ती म्हणजे ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नुकताच कलर्स मराठी वाहिनीवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे आणि या मालिकेच्या पुन:प्रसारणाबद्दल माहिती देण्यात आली आहे. “प्रेमाच्या सरींनी मन पुन्हा बावरणार, सिद्धार्थ आणि अनुश्री परत तुमच्या भेटीला येणार! नक्की बघा” असं म्हणत या मालिकेच्या पुन:प्रसारणाबद्दल प्रेक्षकांना माहिती देण्यात आली आहे. ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ ही मालिका येत्या नोव्हेंबरपासून दुपारी १ वाजता फक्त कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहता येणार”.
दरम्यान, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतील मुख्य कलाकार म्हणजे अभिनेता शशांक केतकर व अभिनेत्री मृणाल दुसानीस सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. शशांक हा मुरांबा मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे तर मृणाल लवकरच १६ डिसेंबरपासून, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेसाठी तिचे अनेक चाहते आतुरतेने वाट पाहत असतानाच आता तिच्या एका जुन्या मालिकेचेही पुन:प्रसारण होणार आहे.