काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास मांडणारा बहुप्रतीक्षित ‘छावा’ या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरमध्ये शत्रुंशी लढताना विकी कौशलचा रुद्रावतार पाहायला मिळाला आणि राज्याभिषेक सोहळ्याचीही झलक दिसत आहे. तसंच या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळतानाचेही दृश्य पाहायला मिळाले. यावरून मोठा वादंग निर्माण झाला. अनेक शिवप्रेमींकडून याबद्दल आक्षेप नोंदवण्यात आला. मंत्री उदय सामंत यांनीही याबद्दल बोलताना “महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही” असं म्हणत जणू थेट इशाराच दिला आहे. (Ruchira Jadhav on chaavaa movie controversy)
‘छावा’च्या ट्रेलरमधील लेझीम खेळतानाच्या दृश्यावर वादंग होताच चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोमवारी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यानंतर लक्ष्मण उतेकरांनी माध्यमांशी संवाद साधताना चित्रपटातील वादग्रस्त लेझीम नृत्याचा प्रसंग काढला जाणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच हा चित्रपट प्रदर्शनाआधी इतिहासतज्ज्ञांनाही दाखविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र लेझीम नृत्याचा प्रसंग काढल्याची घोषणा होताच अनेकांनी दु:खही व्यक्त केलं आहे. अशातच अभिनेत्री रुचिरा जाधवनेही याबद्दल तिची भूमिका स्पष्ट केली आहे.

रुचिराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘छावा’ चित्रपटासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “मला आवडलं असतं, माझ्या राजाला नवीन रुपात बघायला. ज्याने स्वतःच्या कारकिर्दीत एवढं सगळं झेललं, त्याला त्याचा आनंद ‘परंपरा जपत’ साजरे करताना बघायला”. यापुढे तिने आक्षेप घेणाऱ्यांबद्दल असं म्हटलं आहे की, “Cinema is an Art. मुळात असे दृष्य दाखवण्यामागचा हेतू समजून न घेता चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे नकारात्मकता पसरवणं हे किती योग्य आहे? खरंतर या अशा लोकांचा किंवा वृत्तीचा हेतू तपासला गेला पाहिजे”.
आणखी वाचा – ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेत्याने घेतली महागडी कार, चाहत्यांसह कलाकारांनी केलं कौतुक, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, ‘छावा’ हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल साकारत असून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्ना याने साकारली आहे.