झगमगत्या विश्वातील ग्लॅमरमागे सेलिब्रिटींना अनेक वाईट प्रसंगांचा सामना करावा लागतो. सिनेविश्वात स्वतःची ओळख निर्माण करत असताना अभिनेत्रींना अनेक अडचणींतून जावं लागतं. यातील मुख्य अडचण म्हणजे कास्टिंग काउच. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊचशी संबंधित किस्से वेळोवेळी कानावर येत असतात. याबद्दल पूर्वी अभिनेत्री भाष्य करत नसत, पण आता मात्र त्या स्वत: पुढे येऊन याबद्दल उघडपणे सांगतात. अशातच नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत ‘दंगल’ फेम अभिनेत्री फातिमा सना शेखने दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील कास्टिंग काउचचं रहस्य उघड केलं आहे. दाक्षिणात्य चित्रपटांसाठी ऑडिशन देताना कास्टिंग काउचचा सामना करावा लागल्याचा खुलासा तिने केला. (fatima sana shaikh casting couch)
आमिर खानची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘दंगल’ मधील भारतीय महिला कुस्तीपटू गीता फोगटच्या भूमिकेतून फातिमा सना शेखला खूप लोकप्रियता मिळाली. पण फातिमाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटातून केली. यावेळी तिला “तू सर्वकाही करण्यासाठी तयार आहेस ना?” असा प्रश्न विचारण्यात आला. कास्टिंग एजंटच्या प्रश्नाचं उत्तर देत फातिमा म्हणाली, “मी प्रचंड मेहनत करेल आणि चित्रपटातील भूमिकेसाठी जे काही गरजेचं असेल ते सर्वकाही करण्यासाठी मी तयार आहे. त्याला काय म्हणायचं आहे मला कळत होतं. पण मी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. मला देखील पाहायचं होतं तो किती खालच्या पातळीला जात आहे”.
आणखी वाचा – ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेत्याने घेतली महागडी कार, चाहत्यांसह कलाकारांनी केलं कौतुक, व्हिडीओ व्हायरल
यापुढे ती म्हणाली की, “निर्माते यावर बिनधास्त बोलतात. म्हणतात, ‘तुला माहिती आहे याठिकाणी लोकांना भेटावं लागतं. ते कधीच स्पष्ट शब्दात बोलणार नाही. पण त्यांचा हेतू आपल्याला कळलेला असतो. ते म्हणतात, तुला लोकांना भेटावं लागेल, सर्वकाही करावं लागेल. इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर मी अनेक वाईट गोष्टी ऐकल्या आहे. ज्या मन हेलावून टाकतात. सेलिब्रिटींना वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो”.
दरम्यान, फातिमाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. ‘दंगल’नंतर फातिमाने ‘लूडो’, ‘अजीब दास्तान’ आणि ‘सॅम बहादूर’मध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. फातिमा सना शेख लवकरच अनुराग बसूच्या रोमँटिक ड्रामा ‘मेट्रो…इन डिनो’ मध्ये दिसणार आहे.