Priya Bapat Post : पुरोगामी विचारांचा मानला जाणारा महाराष्ट्र हा गेल्या काही दिवसांतील महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराने पुरता हादरून गेला आहे. कोलकाता डॉक्टर बलात्कार प्रकरण, त्यानंतर बदलापूर येथे दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटताना दिसले. त्यानंतर तर महिलांवरील रोजच्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असल्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न आता आणखीनच गंभीर झाला आहे. कोलकाता नंतर बदलापूर घटनेवर सर्वच स्तरातून रोष व्यक्त केला गेला. मनोरंजन, राजकीय तसंच क्रीडा व उद्योग क्षेत्रातून या घटनेवर प्रतिक्रिया उमटल्या होत्या. (Priya Bapat on Badlapur and Kolkata Rape Case)
२० ऑगस्ट रोजी बदलापूरकरांनी तब्बल ११ तास रेल रोको करत सरकारला धारेवर धरलं. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या प्रकरणाबद्दल अनेकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यामध्ये बॉलिवूडसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. आपल्या सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत या कलाकारांनी पीडित चिमूकल्यांना न्याय व आरोपीला शिक्षा देण्याची मागणी केली होती. या घटनेला आता जवळपास एक आठवडा झाला असून या प्रकरणी काही ठोस पावले उचलली गेली नसून ही घटना आता सर्व विसरून गेलेत की काय असा प्रश्न प्रिया बापटने व्यक्त केला असून तिने यासंबंधित एक पोस्टही शेअर केली आहे.

प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे असं म्हटलं आहे की, “आपण आता कदाचित त्याबद्दल पोस्ट करणे बंद केले असेल. परंतू, हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. न्याय मिळाला नाही. अजूनही सुरक्षितता कमी आहे आणि खरी समानता हे अजूनही खूप लांबचे ध्येय आहे”. प्रियाने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने घटनांचा उल्लेख केलेला नसला तरी प्रियाचा रोख हा नुकत्याच झालेल्या कोलकाता व बदलापूर घटनेकडे असल्याचे दिसून येत आहे. प्रियाने तिच्या या पोस्टद्वारे या घटनांबद्दल पुन्हा एकदा आठवण करुन दिली असून न्याय व सुरक्षिततेची मागणी केली आहे.
दरम्यान, बदलापूर व कोलकाता प्रकरणी मराठीतील अनेक कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. प्रसाद ओक, मृण्मयी देशपांडे, सिद्धार्थ चांदेकर, अभिजीत केळकर, शिवाली परब, रितेश व जिनीलिया देशमुख, कुशल बद्रिके, सुरेखा कुडची, सोनाली कुलकर्णी, यांसारख्या अनेक कलाकारांनी या घटनेवर संताप व्यक्त केला होता. अशातच आता प्रियाने पुन्हा या घटनेबद्दल आठवण करून दिली आहे