Pooja Sawant First Makar Sankrant : आज वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत. सगळेचजण हा वर्षाचा पहिला सण अगदी दणक्यात साजरे करताना दिसतात. विशेषतः नववधूंना तर या सणाची उत्सुकता लागून राहिलेली असते. तर कलाकार मंडळीही हा सण अगदी धुमधडाक्यात साजरा करताना दिसतात. यंदा तर अनेक अभिनेत्रींची ही पहिली मकर संक्रांत आहे. काही महिन्यांपूर्वीच लग्न बंधनात अडकलेल्या अभिनेत्री यंदाची मकर संक्रांत साजरी करण्यासाठी अधिक उत्साही असल्याचं पाहायला मिळते. अशातच या मराठमोळ्या अभिनेत्रींमध्ये लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत अभिनेत्री पूजा सावंत हिने साजरी केली असल्याचे समोर आलं आहे. सोशल मीडिया अकाउंटवरुन तिच्या पहिल्या मकरसंक्रांतीचा सुंदर असा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.
यंदाची ही मकर संक्रांत पूजाने भारतात नव्हे तर तिच्या ऑस्ट्रेलिया येथील घरी साजरी केली आहे. पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. पूजाचा नवरा हा मूळचा भारतातला असला तरी तो कामानिमित्त ऑस्ट्रेलिया येथे स्थित आहे. त्यामुळे बरेचदा पूजा ऑस्ट्रेलिया भारत असा दौरा करताना दिसते. आता यंदाच्या मकर संक्रांती दिवशी पूजा ऑस्ट्रेलियात असल्यामुळे यंदाची संक्रांत तिने ऑस्ट्रेलिया येथे साजरी केली आहे. “लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत ऑस्ट्रेलियात’ असं कॅप्शन देत हा सुंदर असा व्हिडीओ तिने पोस्ट केला आहे.
या व्हिडीओमध्ये पूजा मकर संक्रांत साजरी करताना दिसत आहे. यावेळी सुगड पुजून तिने देवाचे आशीर्वाद घेतलेले दिसत आहेत. त्यानंतर तिळगुळही ती देताना दिसतेय. ही मकर संक्रांत पूजासाठी अधिक खास आहे, कारण यावेळी तिचे आई-बाबा, बहिण-भाऊ हे सगळेजण तिच्याबरोबर ऑस्ट्रेलियात आहेत. काही दिवसांपूर्वी पूजाचे कुटुंबीय ऑस्ट्रेलियात फिरण्यासाठी गेले होते. लेकीचं घर पाहून आई-वडील भावुक झालेलेही पाहायला मिळाले. पूजाने याचा देखील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
आणखी वाचा – Video : अक्षया-हार्दिक पोहोचले देवदर्शनाला, स्वतःच्या खांद्यावरुन वाहिली पालखी, व्हिडीओ व्हायरल
आता आई-वडिलांच्या आशीर्वादाने पूजाने तिची पहिली मकर संक्रांत साजरी केली. यावेळी पूजा व सिद्धेश यांचा खास लूक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता. पूजाने मकर संक्रांत स्पेशल काळ्या रंगाची काठापदराची साडी नेसली होती आणि त्यावर हलव्याचे दागिने परिधान केले होते. या सजलेल्या लूकमध्ये पूजा खूपच सुंदर दिसत होती. तर सिद्धेशनेही काळ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर हलव्याचे दागिने परिधान केले होते. सिद्धेश व पूजाच्या या पहिल्या मकर संक्रांतीच्या व्हिडीओवर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केलेला पाहायला मिळाला. तर नेटकऱ्यांनीही तिच्या लूकचं कौतुक करत अनेक कमेंट केल्या असून लाईकचा वर्षाव केला. सध्या पूजाचा हा मकर संक्रांत स्पेशल व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.