कोणत्याही व्यक्तीसाठी घटस्फोट होणे किंवा एखादे नाते तुटणे हे दु:खदायक असते. त्यातही घटस्फोट झालेली स्त्री मनोरंजन या क्षेत्राशी संबंधित असेल तर तिच्या वाट्याला येणारा संघर्ष हा आणखीनच असतो. मनोरंजनासारख्या अनिश्चित क्षेत्रात कार्यरत असताना एखाद्या महिला कलाकाराला अनेक समस्या व अडथळ्यांना सामोरे जावे लागते. अशीच अनेक समस्या व अडथळ्यांवर मात करत आपलं आयुष्य सजगतेने जगणारी एक मराठी अभिनेत्री म्हणजे नियती राजवाडे. नियती यांनी आजवर अनेक समस्यांना हसत-खेळत सामोरे जात आपलं आयुष्य जगलं आहे. त्यांच्या याच आयुष्याबद्दल नियती यांनी ‘इट्स मज्जा’शी संवाद साधला. (Niyati Rajwade on post-divorce life)
नियती यांनी आजवर अनेक नाटक, मालिका व काही चिटपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. केवळ मालिकांमध्येच नव्हे तर रिअॅलिटी शोमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. नियती यांनी ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘कॉमेडी एक्सप्रेस’ तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसारख्या मराठी विनोदी कार्यक्रमांमधूनही प्रेक्षकांना हसवण्याचे काम केलं आहे. मात्र कायम हसत-खेळत राहणाऱ्या नियती यांच्या आयुष्यात काही दिवसांपूर्वी कठीण काळ आला होता. या कठीण काळात नियती कशा खंबीर राहिल्या. याबद्दल त्यांनी ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात सांगितले.
यावेळी नियती यांना “या क्षेत्रात खंबीर राहायला कधी शिकलात?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत नियती यांनी असं म्हटलं की, “अनेकवेळा खंबीर राहावं लागलं. नुकताच लॉकडाऊनमध्ये माझा घटस्फोट झाला. खरंतर मला याबद्दल काही बोलायचं नाही. कारण ही काही मोठी कामगिरी नाही. त्यामुळी मला माझ्या घटस्फोटाबद्दल फारशी वाच्छता करायला नाही आवडत. कारण तो काही मला अवॉर्ड नाही मिळाला. एका स्त्रीच्या आयुष्यात तिला एक मुलगा असताना आणि ती एकटी असताना खूप काठीण प्रसंगातून जावं लागतं.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “तेव्हा लॉकडाऊन होतं. सगळ्यांची आर्थिक गणिते चुकलेली होती. पण त्या क्षणी कळलं की, आता उभं राहीलं नाही तर आपण अजून खचले जाऊ शकतो. त्यामुळे घटस्फोटानंतर मी खंबीर राहिले आणि यात मला माझ्या मुलाची साथ मिळाली. त्याचदरम्यान आम्हाला आमचं राहतं घरही सोडावं लागलं होतं. त्यावेळी मला माझ्या दहा वर्षांच्या मुलाने सांभाळलं. त्या काळात तो माझा समुपदेशक होता. त्याने मला मी कोणत्याही परिस्थितीत कायम तुझ्याबरोबरचं राहीन असं म्हटलं होतं”.