मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहऱ्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री मृणाल दुसानिस. मृणालने आजवर अनेक मालिकांमधून चाहत्यांच्या मनात घर केलं. ‘तू तिथे मी’, ‘असं सासर सुरेख बाई’, ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’, ‘हे मन बावरे’ या मालिकांमधून मृणालने लोकप्रियता मिळवली. ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’ या मालिकेमुळे मृणालला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मालिकाविश्वात कार्यरत असणारी ही अभिनेत्री गेल्या चार वर्षांपासून सिनेविश्वपासून दूर आहे. (Mrunal Dusanis On Career Turning Point)
मृणालने २०१६ साली नीरज मोरेसह लग्नगाठ बांधली. लग्नानंतर काही वर्ष तिने काम केले. मात्र मृणालचा नवरा हा कामानिमित्त अमेरिकेत राहत असल्याने ती देखील अमेरिकेला निघून गेली. त्यामुळे गेली चार वर्ष मृणाल सिनेसृष्टीपासून दूर आहे. आयुष्यात करिअरच्या शिखरावर असताना मृणालने हा लग्न करण्याचा आणि लग्नानंतर मालिकाविश्वातून ब्रेक घेत कुटुंबाला वेळ देण्याचा निर्णय घेतला. आयुष्यात करिअरच्या कलाटणी देणाऱ्या टप्प्यांवर असताना मृणालने लग्नाचा आणि लग्नानंतर ब्रेक घेण्याचा निर्णय का घेतला याबाबत सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
मृणाल याबाबत बोलताना म्हणाली, “मी कधीच काहीच ठरवून करत नाही. मी परिस्थितीनुसार पुढे जाणारी मुलगी आहे. मला असं वाटलं की, माझं आता लग्नाचं वय आहे. आणि तेव्हा माझं २८ वय होतं. तर मला असं वाटलं की, आता चांगला मुलगा आयुष्यात आला आहे आणि ही योग्य वेळ आहे, असंही वाटलं. लग्नानंतर माझं करिअर थांबलं अशातला काही भाग नाही. मी इकडे काम करत होते, तोही तिकडे काम करत होता. तेव्हा आमचं असंच ठरलं होतं की, सध्या आपण काही वर्ष एकमेकांच्या कामांना प्राधान्य देऊया. तेव्हा आम्ही वेळ मिळेल तसे एकमेकांना भेटायचो”.
अभिनेत्री पुढे म्हणाली, “कधी तो अमेरिकेतून यायचा तर कधी मी बाहेरगावी कुठे गेले तर तो तिथे यायचा. तर तेव्हा आम्ही असा क्वालिटी टाइम एन्जॉय करायचो. आणि मुळात तेवढा समजूतदारपणा त्याच्यात आहे. ‘हे मनं बावरे’नंतर आम्हाला असं वाटलं की, आम्ही खूप एकटे राहिलो आहोत. आता आपण भेटूया आणि कुटुंबालाही थोडा वेळ देऊयात. दोघांच्या सहमताने हा निर्णय घेतला म्हणून हे सर्व शक्य झालं, असं मला वाटतं”.