अभिनेता हार्दिक जोशी व अभिनेत्री अक्षया देवधर हे मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. हार्दिक व अक्षया यांनी २ डिसेंबर २०२२ ला लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ही जोडी बरेचदा चर्चेत असलेली पाहायला मिळाली. हार्दिक व अक्षयाच्या शाही विवाहसोहळ्याचेही अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. अगदी थाटामाटात ही जोडी लग्नबंधनात अडकली. हार्दिक व अक्षया यांच्या लग्नात त्याचे कुटुंबीय, जवळचे नातेवाईक व कलाकार मंडळीही उपस्थित असलेले पाहायला मिळाले. (Akshaya Deodhar Birthday Celebration)
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून हार्दिक व अक्षया ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. दोघांनी या मालिकेत पहिल्यांदाच एकत्र काम केले. या मालिकेतील शरीराने दणकट असलेला परंतु मनाने साधा भोळा असणारा पहिलवान राणा आणि गावातील शाळेत शिक्षिका असलेल्या पाठक बाईंची प्रेमकथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मालिकेत काम करता करता दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमात झालं.
सोशल मीडियावरही ही जोडी बरीच चर्चेत असते. दोघेही नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच अक्षयाच्या वाढदिवसाचे फोटो, व्हिडीओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले आहेत. अक्षयाला ३०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत हार्दिकने तिला खास सरप्राइजही दिलं आहे. “तुझ्याबरोबर प्रेम आणि अंतहीन आठवणींचे आणखी एक वर्ष. वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या प्रिय”, असं म्हणत त्याने अक्षयाचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अक्षया केक कापताना दिसत आहे. तिच्या मित्र परिवाराबरोबर ते त्यांचा वाढदिवस एका हॉटेलमध्ये साजरा करताना दिसले. शिवाय घरीही हार्दिकने वाढदिवसाची सजावट करत तिला सरप्राइज दिलं. यावेळी त्याने अक्षयाच्या तिसाव्या वाढदिवसानिमित्त तीस या अंकाचा केकही बनवून घेतला होता.