मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी ही त्यांच्या क्षेत्रात काम करण्याबरोबरच सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवरही भाष्य करत असतात, अशा काही कलाकारांपैकी एक अभिनेता म्हणजे शशांक केतकर. शशांक हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियाद्वारे तो नेहमीच त्याच्या राजकीय व सामाजिक भूमिका मांडत असतो. अशातच अभिनेत्याने परवा (१३ मे) रोजी घाटकोपर येथे पडलेल्या होर्डिंगबद्दल प्रकरणी त्याची भूमिका मांडली आहे.
शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीद्वारे त्याने त्याचा राग व संताप व्यक्त केला आहे. शशांकने या व्हिडीओमध्ये असं म्हटलं आहे की, “मुंबईमध्ये परवा एक मोठं वादळ आलं आणि या वादळात काही ठिकाणी घटना घडल्या. यामध्ये घाटकोपरमधील एका पेट्रोलपंपाच्या इथे १२०×१२० चं मोठं होर्डिंग पडलं. त्यामुळे त्याखाली उभ्या असलेल्या काही लोकांचा मृत्यू झाला. यातील मृतांचा आकडा हा १४ आहे. हे सगळं बघून मला कोणत्याच पक्षाला किंवा राज्यकर्त्याला दोष द्यायचा नाहीये. कारण ही एक नैसर्गिक आपत्ती होती. यात आपल्या कुणाचा थेट संबंध नाही. पण आपल्या देशाची लोकसंख्याच इतकी आहे की, आपल्या जगण्याची किंवा आपली किंमत इथे अगदीच शून्य आहे”.
यापुढे त्याने म्हटलं की, “आपल्या देशात गेल्या काही वर्षांत अनेक विकासाची कामे होत आहेत. वेगवेगळ्या पातळीवर ही सगळी लोकोपयोगी कामे होत आहेत. पण अनेक गोष्टींची सुधारणा व्हावी असं मला वाटतं.१२०×१२० फूट उंच बोर्ड वाऱ्याने पडतो ही खूप विचार करायला लावणारी बाब आहे. अर्थात आता या बोर्ड प्रकरणी एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षावर आरोप-प्रत्यारोप करायला सुरुवात झाली आहे. हा बोर्ड अनधिकृत होता, मुंबईत इतक्या मोठ्या होर्डिंगला परवानगीच नाही आणि या बोर्डचा मालकही आता पळून गेला आहे असंही म्हटलं जातं आहे. आता देशाची लोकसंख्या वाढलीच आहे तर त्या लोकसंख्येसाठी लागणारी रोडवाढणी करणे हे तुमचंच काम आहे ना? मी कोणत्याच पक्षाला किंवा नेत्याला याबद्दल दोष देत नाहीये पण कोणत्याही सरकरने हे काम करणे गरजेचे आहे”.
आणखी वाचा – ‘मेष’ व ‘मीन’ राशीसाठी बुधवार ठरणार लाभदायक, नोकरीत मिळणार बढती, आणखी कुणाचे नशीब उजळणार?, जाणून घ्या…
यापुढे शशांकने नुकसानभरपाईबद्दल त्याचं मत व्यक्त करत असं म्हटलं की, “तुम्ही आमच्या नातेवाईकांना किंवा पालकांना पैसे देऊन उपयोग नाही. तुम्ही तेच पैसे त्या विकासकामात लावले तर बरं होईल. नशीब आता शाळा सुरू नाहीत, अन्यथा त्या होर्डिंगखाली एखादी शाळेच्या लहान मुलांना घेऊन जाणारी बस उभी असती तर, किती लहान लहान मुलांचा जीव गेला असता याची कल्पना करवत नाही. लाजा वाटत नाहीत का तुम्हाला?, मी एक सुजाण नागरिक म्हणून सांगत आहे. मी मतदानसुद्धा केलं आहे. त्यामुळे कृपा करून सांगतो हे होर्डिंग किंवा फ्लेक्स लावणं बंद करा. त्यावर तुमची व तुमच्या कार्यकर्त्यांचे चेहरे बघण्यात आम्हाला जराही रस नाही. तुमच्यामुळे लोकांचे नाहक जीव जात आहेत. लोकांना जगण्याचा अधिकार आहे, त्यांना नीट जगू द्या. तुमच्या या चढाओढीत, अहंकारामुळे आमचे जीव जात आहेत, ते घेणं बंद करा. तुम्हाला आमच्या जीवाशी खेळ करण्याचा कुठलाच अधिकार नाही.”
यापुढे त्याने असं म्हटलं की, “देश आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप चांगलं काम करत असला तरी देशातील अनेक मूलभूत व छोट्या छोट्या गोष्टींवर काम करण्याची गरज आहे. देशात ज्या ज्या ठिकाणी मतदान झाले, तिथल्या शाळांची अवस्थादेखील नीट नव्हती. निदान लाजेखातर तरी त्या सुधारणा करा. मी कोणत्याच पक्षाचा नाही. पण अशा घटना घडल्या की नागरिक म्हणून मला राग येतो आणि तो मी व्यक्त करत आहे. देशात सगळीकडे नुसता गोंधळ सुरु आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याशिवाय आपण काहीच करत नाही आहोत. त्यामुळे आता हे सगळं थांबवा.”