‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या जोरदार सुरू आहे. पहिल्या दिवसापासून घरात एकमेकांचे वाद होत आहेत. वर्षा उसगांवकर व निक्की तांबोळी यांच्यातील वाद तर थांबायचं नावचं घेतं नाहीये. निक्की सतत वर्षा उसगांवकरांचा अपमान करताना दिसत आहे. अनेक मराठी कलाकारांनी, नेटकऱ्यांनी सोशल मीडियाद्वारे निक्की विरोधात आवाज उठवला आहे. अशातच अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी वर्षा उसगांवकर व निक्की तांबोळी यांच्यातील वादावर आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. यावेळी त्यांनी तरुण मुलांकडून आमच्या सारख्यांना डावललं जात असल्याचे सांगितलं.
किशोरी शहाणे यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात ‘बिग बॉस मराठी’च्या नुकत्याच सुरु झालेल्या पर्वाबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “पहिला भाग बघितल्यानंतर मला खूपच मज्जा आली. नंतरचे भाग मी पाहिले नाहीत. पण मी बघायचा प्रयत्न करत आहे आणि वर्षाला तोच प्रॉब्लेम होत आहे, जो मला झाला होता. तो म्हणजे यंगस्टर्स (तरुण मुलं-मुली) ते आपल्याला डावलतात. आदर न देता मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. ‘बिग बॉस’च्या घरातील वातावरण हे खूपच ताणावाचं होतं. मी खूप टेंशनमध्ये होते. कारण ते आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “ते (बिग बॉस) तुम्हाला एकटं पाडतात आणि तो त्यांचा खेळ असतो. म्हणजे तुम्ही इतकं नाराज व्हायला पाहिजे की, तुम्ही घरातून बाहेरचं पडलं पाहिजे. कारण तो एक वैयक्तिक खेळ आहे. एकालाच ट्रॉफी मिळणार असते. त्यामुळे प्रत्येक जण दुसऱ्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे ‘बिग बॉस’ प्रत्येकाची कमी बाजू काय आहे हे बघत असतात. मला असं वाटतं की, मी ‘बिग बॉस’च्या घरात १५ लोकांमध्ये जे विश्व जगत असते. तेच बाहेर असतं. पण बाहेर आपल्याला दूसरा मार्ग निवडण्याचा पर्याय असतो. जे लोक माझे पाय खेचत आहेत, त्यांच्याबरोबर मी कशाला राहीन, मी दुसऱ्या लोकांबरोबर जाईन”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “पण ‘बिग बॉस’च्या घरामध्ये हा पर्याय नसतो. त्यामुळे तो ‘बिग बॉस’चा गेम आहे. तुम्हाला त्यांच्याबरोबरचं राहायचं आहे. त्यांचीच विनवणी करुन त्यांना प्रभावित करावं लागतं. जेणेकरुन ते तुम्हाला नॉमिनेट नाही करणार आणि तुम्ही टिकून राहाल”, दरम्यान, किशोरी शहाणे यांनीही बिग बॉसमध्ये सहभाग घेतला होता. या खेळात त्यांनी अंतिम सोहळ्यापर्यंत लढत केली होती.