मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे काल (१३ डिसेंबर) रोजी निधन झाले. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते रवींद्र यांनी वयाच्या ७८व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मागील काही वर्षांपासून त्यांना घशाचा कर्करोग झाला होता. त्यासाठी त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचारही सुरू होते. रवींद्र यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात ऍडमिट केले होते. मात्र उपचारानंतर दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आलं. घरी आणल्यानंतर अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि अखेर त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांच्या जाण्यानं मराठी सिनेसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे. अशातच अभिनेत्री हेमांगी कवीने रवींद्र बेर्डे यांच्यासाठी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. (Hemangi Kavi On Instagram
रवींद्र बेर्डे व हेमांगी यांनी ‘धुडगूस’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यांच्या जाण्याने हेमांगीला अतीव दुःख झाले असून त्यांच्या आठवणीत हेमांगीने एक भावुक पोस्ट लिहिली आहे. यात तिने असं म्हटलं आहे की, “रवींद्रदादा बेर्डे गेल्याची बातमी कळली आणि मी थेट कोल्हापुरात पोहोचले. २००८ साली ‘धुडगूस’ चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापुरात केलं होतं. त्यात मी रविंद्रदादांच्या मुलीचं काम केलं. तोपर्यंत मी त्यांना विनोदी भुमिकांमध्ये पाहिलं होतं. पण ‘धुडगूस’मधला त्यांनी साकारलेला बाप, निव्वळ कमाल होता.”
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “चित्रपटातील हा प्रसंग माझा सर्वात आवडता आहे. यातली बापाची हतबलता, चुकीच्या घरात मुलीचं लग्न लावून दिल्याचा पश्चाताप, आता आपण मुलीसाठी काहीच करू शकत नसल्याच्या जाणिवेने कासावीस झालेला चेहरा हे सगळं काहीही न बोलता फक्त चेहऱ्याने दाखवणं खुप कठीण असतं जे त्यांनी सहज केलं होतं. आणि हे सगळं वन-टेकमध्ये झालं होतं हे मला आजही आठवत आहे. जो नट इतकी वर्ष हसवत आला त्याला असं रडताना पाहून काळीज पिळवटून निघतं. ज्यांना लहानपणापासून पडद्यावर पाहत आलो त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही कायम आमच्या स्मरणात रहाल.”
दरम्यान, या पोस्टसह ‘धुडगूस’मधील हेमांगीने सांगितलेला त्या सीनचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. यात रवींद्र बेर्डे यांचा कसदार अभिनय पाहायला मिळत आहे. या पोस्टखाली अनेक नेटकऱ्यांनी रवींद्र यांच्या कामाचे कौतुक केले आहे. तसेच हेमांगीच्या या पोस्टवर अभिनेत्री स्पृहा जोशीने “हेमांगी, हे तुझ्या आतापर्यंतच्या कामातील सर्वोत्तम काम आहे. रवींद्र काकांबरोबर काम केल्याचा आशीर्वाद तुला मिळाला” अशी प्रतिक्रिया दिली आहे.