स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘आई कुठे काय करते?’ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेला इतके दिवस होऊनही उत्तम कथानकामुळे व कलाकारांच्या उत्कृष्ट कामामुळे ही मालिका आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. त्यामुळे मालिकेबरोबरच मालिकेतील कलाकारांचं ही सर्वत्र कौतुक होत आहे. मालिकेतील कलाकार हे नेहमीच पडद्यामागील घटना, प्रसंग किंवा काही दृश्ये त्याच्या चाहत्यांबरोबर सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. अशातच अभिनेत्री रूपाली भोसलेने मालिकेच्या सेटवरील काही खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. (Rupali Bhosle On Instagram)
रुपालीने शेअर केलेल्या व्हिडीओमधून एका सीनसाठी कलाकारांसह इतर तंत्रज्ञ मंडळी किती मेहनत घेतात हे दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेचा सेट दिसत आहे. मालिकेतील कुठल्या तरी एका सीनसाठी तंत्रज्ञ मंडळींकडून घराचा एक खास सेट लावला जात आहे आणि याचा व्हिडीओ रूपालीने तिच्या इन्स्टाग्रामद्वारे शेअर केला आहे. या आर्ट डिपार्टमेंटच्या कलाकारांनी या सेटला घराचे रूप दिले आहे त्यामुळे त्यांचे कौतुक करणारे एक खास कॅप्शनही तिने लिहिलं आहे.
रुपालीने या व्हिडीओखाली असं म्हटलं आहे की, “हा आहे आमचा सेट आणि प्रत्येकवेळी अगदी कमी वेळात ही मंडळी सेट उभा करतात. गेली ४ वर्षे मी या मालिकेत काम करत असून रोज ही गोष्ट पाहत आहे. यांची ही तयारी बघताना जसं नाटकाच्या व चित्रपटाच्या नेपथ्यासाठी बक्षिसे किंवा पुरस्कार दिले जातात. तसंच मालिकेच्या सेटसाठी सुद्धा देणे आवश्यक आहे. कारण ही मंडळी खूप कमालीचे काम करतात आणितेही ओज करतात. यामुळे मालिका विश्वातल्या आर्ट डिपार्टमेंटचे मला खूप कौतुक आहे. कारण त्यांच्या मेहनतीमुळे मालिकेच्या सेटचे घर बनते.”
या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी कमेंट्समध्ये त्यांना हा सेट आवडल्याचे सांगितले आहे. तसेच या तंत्रज्ञ मंडळींचेही कौतुक केले आहे. दरम्यान, रुपाली ‘आई कुठे काय करते?’ मालिकेत संजना हे पात्र साकारत असून तिची भूमिका चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. तसेच या मालिकेलादेखील प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.