Nitin Desai Funeral Update : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण कलाविश्वाच हादरुन गेलं. या घटनेनंतर देसाई कुटुंबियांवर तर दुःखाचा डोंगर कोसळला. बुधवारी (२ ऑगस्ट) सकाळी एनडी स्टुडिओ येथे गळफास घेत नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. आज एनडी स्टुडिओ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सकाळपासूनच त्यांच्या अंतिम दर्शनासाठी एनडी स्टुडिओमध्ये तुफान गर्दी जमली आहे. यादरम्यानचे बरेच व्हिडीओही आता समोर येत आहेत. कलाविश्वातील या सुप्रसिद्ध कलाकाराला शेवटचा निरोप देताना अनेकांना अश्रु अनावर झाले. तर नितीन देसाईंच्या मुलीचाही एक व्हिडीओ समोर आला आहे.
फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून नितीन देसाईंचं पार्थिव एनडी स्टुडिओमधील ‘जोधा अकबर’च्या सेटवर आणण्यात आलं. याच सेटवर अंतिम दर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं आहे. सुबोध भावे, मानसी नाईक, रवी जाधव, अभिजीत केळकर यांसारख्या अनेक मराठी कलाकारांनी नितीन देसाईंच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं.
इतकंच नव्हे तर कलाकारांबरोबरच विनोद तावडे, किरीट सोमय्या, उदयनराजे भोसले यांसारखी दिग्गज राजकीय मंडळी एनडी स्टुडिओ येथे पोहोचली आहेत. दरम्यान या गर्दीमध्ये नितीन देसाईंची लेक मानसी देसाईने तिच्या अश्रुंना वाट मोकळी करुन दिली. मानसीला रडताना पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
पाहा व्हिडीओ
नितीन देसाई यांची पत्नी, जावई व मुलगी अंतिम दर्शनासाठी पोहोचली. यावेळी मानसी तिच्या वडिलांच्या जवळ गेली. वडिलांना पाहत असताना तिला अश्रू अनावर झाले. तर कुटुंबातील इतर मंडळींनाही नितीन देसाईंना या अवस्थेत पाहणं सहन झालं नाही. नितीन देसाईंच्या अचनाक जाण्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.