मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. तिने विविध मालिका, चित्रपट, नाटक तसेच ओटीटी क्षेत्रात काम करत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. यासह ती विविध जाहिरातीतूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. नुकतंच तिच्या आणखी एका जाहिरातीचं चित्रीकरण झालं. मात्र ही जाहिरात तिच्यासाठी खूप खास ठरली. कारण या जाहिरातीत तिने बॉलिवूडचे बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांच्यासह स्क्रीन शेअर केली आहे. नुकत्याच ‘महाराष्ट्र टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तिने यावेळीचा अनुभव शेअर केला. (Hemangi kavi share experience with amitabh)
हेमांगीने ‘कट टू’ या नव्या जाहिरातीत अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याबरोबर काम करण्याचा तिचा अनुभव अगदी स्वप्नवत होता. यापूर्वीही ती अमिताभ यांच्याबरोबर जाहिरातीत झळकली होती. पण त्यावेळी तिला अमिताभ यांच्याबरोबर प्रत्यक्ष चित्रीकरणाची अनुभव घेता आला नव्हता. या जाहिरातीत मात्र अमिताभ यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा पूर्ण झाली. चित्रीकरणावेळी त्यांना अगदी जवळून पाहण्याची, त्यांच्याबरोबर काम करण्याची, त्यांच्यासह चित्रीकरण करण्याची संधी अगदी चालून आली. या सगळ्या अनुभवांबद्दल बोलताना हेमांगी म्हणाली, “काही दिवसांपूर्वी मला एका जाहिरातीसाठी विचारण्यात आलं. मी ऑडिशन दिली. त्यात माझी निवडही झाली. शूटिंगच्या दिवशी मी सेटवर पोहोचून तयारही झाले. तिथे बरीच शांतता होती. मी त्यांना विचारलं तर त्यावर त्यांच्याकडून उत्तर आलं की, ‘सर येणार आहेत’. थोड्यावेळात तिथे सिक्युरिटी गार्ड दिसले. मी त्यांना पुन्हा विचारलं, ‘त्यांना झेड सिक्युरिटी असते का?’ त्यावर ते म्हणाले, ‘सर म्हणजे अमिताभ बच्चन!’ हे शब्द ऐकल्यावर माझा विश्वासच बसेना. मी स्तब्ध झाले. मला त्यांना भेटण्याची, प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा कधीपासून होती”.
हेमांगी पुढे सांगते, “काही तांत्रिक कारणांमुळे चित्रीकरण उशीरा सुरु होणार होतं. दुपारचे ३ वाजले तरी चित्रीकरणाला सुरुवात झाली नव्हती. त्यानंतर काही वेळातच सेटवर गडबड सुरु झाली. अमिताभ हे चित्रीकरणासाठी पोहोचले होते. मी त्यांना प्रत्यक्ष बघितलं आणि त्यांच्याबरोबर अंतिम तालीम करायचा क्षण आता आला होता यावर माझा विश्वासच बसला नाही. या सगळ्यावर विश्वास बसायला मला काही वेळ लागला.”
अमिताभ यांच्याबरोबर चित्रीकरणाच्या वेळचा अनुभव सांगताना हेमांगी पुढे म्हणाली, “अमिताभ यांच्याबरोबर सराव करताना मी नकळत त्यांच्या संवादाला एक प्रतिक्रिया दिली. तेव्हा त्यांनी मला विचारलं, ‘तुम्ही असं करणार आहात का?’ त्या क्षणाला मी थोडी घाबरले. मी ते सांगणं चुकीचं होतं का अशी शंका माझ्या मनात आली. त्यानंतर मी पुन्हा त्यांच्याबरोबर सराव करायला सुरुवात केली. यावेळी मात्र मी आधी दिलेली प्रतिक्रिया दिली नाही. यावेळी मी सहदिग्दर्शकाबरोबर जे ठरलं होतं त्याचप्रमाणे केलं. तेव्हा अचानक अमिताभ सर थांबले आणि म्हणाले, ‘तुम्ही आधी दिलेली प्रतिक्रिया दिली नाहीत. ती चांगली वाटत होती’. त्यानंतर मग मी सहदिग्दर्शकाची परवानगी घेतली आणि त्याप्रमाणे २-४ शॉर्ट्समध्ये साधारण अर्ध्या तासात चित्रीकरण पूर्ण केलं. त्यांच्याबरोबरचा संपूर्ण वेळ अगदी स्वप्नवत होता”, असं हेमांगी कवीने सांगितलं.
दरम्यान तिने बिग बी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जाहिराती चित्रीकरणावेळीचा एक फोटो पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. हेमांगी यापूर्वीही अमिताभ यांच्याबरोबर जाहिरातीत दिसली होती. मात्र जाहिरातीचं चित्रीकरण एकत्र झालं नव्हतं. त्यामुळे त्यांना प्रत्यक्षात पाहण्याची हेमांगीची संधी हुकली. मात्र या जाहिरातीच्या निमित्ताने तिचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे.