मराठी मालिकांमधील लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक चेहरा म्हणजे हर्षदा खानविलकर. मराठी मालिकांमध्ये त्यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिका तर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडल्या. शिवाय छोट्या पडद्यावर त्यांची हळवी बाजूही पाहायला मिळाली. चेहऱ्यावर सतत हसू ठेवत प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या हर्षदा अगदी सामान्य कुटुंबातील आहेत. कॉटनग्रीन परिसरामध्ये दहा बाय दहाच्या रुममध्ये त्या राहिल्या. त्यांचं वडिलांवर खूप प्रेम आहे. याचविषयी त्यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. (Harshada Khanvilkar Talk About Her Father)
मुली त्यांच्या वडिलांच्या खूप जवळ असतात असं बोललं जातं. हर्षदा यांच्याबाबत ते अगदी खरं आहे. त्यांनी एका मुलाखतीत वडिलांबाबत अगदी खुलेपणाने भाष्य केलं होतं. वयाच्या ५९व्या वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं. पण हर्षदा यांच्या संपूर्ण करिअरमध्ये त्यांचा खारीचा वाटा आहे. हर्षदा यांनी सांगितलं होतं की, “माझा बाबा जाऊन आता २० वर्ष झाली. माझा बाबा आम्हाला खूप लवकर सोडून गेला. वयाच्या ५९व्या वर्षी त्याचं निधन झालं. जवळपास दिड महिना तो व्हेंटिलेटरवर होता”.
“आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा माझी आई आजारी असायची. आम्ही तेव्हा बाबाला सतत म्हणायचो आई एकदा गेली ना पप्पा की, आपण आपलं आयुष्य मस्त जगायचं. आता आपल्याला हिच्यामुळे खूप अडचणी आहेत. पण सुदैवाने ज्या व्यक्तीने कधी औषधही घेतलं नव्हतं त्याच्यावर ही वेळ आली. माझा बाबा खूप सिगारेट ओढायचा. मी विनंती करते की सिगारेटपासून लांब राहा. माझ्या बाबाला सिगारेटमुळे झालेला त्रास मी पाहिला आहे. अर्थात वेळ आली की माणूस कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जातो. त्याला जगायचं होतं पण तो जगू शकला नाही. बाबा गेल्यानंतर आम्ही फक्त घरात तीन महिलाच होतो. मी, माझी आई आणि बहीण”.
“आम्हाला आमचा बाबा खूप ताकद देऊन गेला होता. आता मी मुलांना बघते तेव्हा मुलं त्यांच्या पालकांना खूप सहज बोलून जातात की, तुम्ही एवढं तरी आमच्यासाठी केलं पाहिजे, तुम्ही आमच्यासाठी काय केलं?. बाबा गेल्यानंतर मला माझ्या बहिणीने सांगितलं की, बाबा बोलायचा ताईसाठी मला काही करता आलं नाही. मात्र तुम्ही जर मला विचारलात तर मी म्हणेन त्याने काय नाही केलं?. त्याने मला माझ्या पायावर उभं केलं. तो मला नेहमी सांगायचा की, हर्षदा बाहेर वागताना खूप आत्मविश्वासाने वागायचं. माझ्या बाबासाठी मी काही करु शकले नाही याचं मला खूप दुःख वाटतं. कारण तो खूप लवकर निघून गेला. आज जर तो मला बघत असेल तर मी एकच सांगू इच्छिते की, तो माझ्यासाठी आजही सर्वकाही आहे”. हर्षदा यांनी सांगितलेला संपूर्ण प्रसंग मनाला चटका लावून गेला.