‘बिग बॉस’चे यंदाचे १७वे पर्व इतर पर्वांपेक्षा जरा अधिकच गाजले. या शोमधील घरातील स्पर्धकांच्या भांडणांमुळे व वादांमुळे ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वाची चांगलीच चर्चा रंगली. अशातच नुकत्याच पार पडलेल्या एका भागात टास्कवरुन घरातील स्पर्धकांमध्ये जोरादार भांडण झाले. टॉर्चर टास्कदरम्यान, स्पर्धकांची दोन टीममध्ये विभागणी केली होती आणि यावरुनच ‘टीम’ ए व टीम बी यांच्यात जोरदार वाद झाला असल्याचे पाहायला मिळाले.
मुन्नवर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार व अरुण महाशेट्टी नॉमिनेशनपासून सुरक्षित आहेत आणि ते थेट अंतिम फेरीत गेले असल्याचे ‘बिग बॉस’ने घोषित केले. यानंतर अंकिता व ईशाने मन्नाराबरोबर वाद घातला आणि या वादात त्यांनी मन्नाराला काही अपशब्द वापरले. यावरुन सोशल मीडियावर आयेशा, ईशा व अंकिता यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. अशातच मराठमोळी अभिनेत्री गायत्री दातार हिनेदेखील सोशल मीडियाद्वारे अंकिता व मन्नाराची त्यांच्या वागणुकीवरुन चांगलीच कानउघडणी केली आहे.
गायत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत अंकिताविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये तिने असे म्हटले आहे की, “गेल्या काही आठवड्यांपासून अंकिता लोखंडेही प्रत्येक भागात फक्त आणि फक्त ओव्हरअॅक्टिंगच करत आहे. त्यामुळे तिला पाहणे हे आता खूपच त्रासदायक झाले आहे. ईशा व आयेशाबद्दल तर आता काही बोलूच शकत नाही. ईशा व आयेशाने मन्नाराच्या चारित्र्यावर बोलणे हे खूपच चुकीचे आहे. अंकिता, आयेशा व ईशा यांसारखे किंवा घरातील इतर कुणाच्याही मदतीशिवाय मन्नाराने तिचे या घरातील आपले स्थान टिकवले आहे.”
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “मीसुद्धा १२ आठवड्यांपासून ‘बिग बॉस’मध्ये होते. पण मी कधीही कोणत्या मुलीला तिच्या चारित्र्यावरुन बोलले नाही. अंकिता व तिच्या २ मैत्रिणी (ईशा व आयेशा) यांनी ते राष्ट्रीय दूरदर्शनवर जे करत आहेत ते थांबवण्याची गरज आहे. टीव्हीवर एखाद्या व्यक्तीचे चारित्र्यहनन करून तिचा अपमान करणे हे अजिबात योग्य नाही.” तसेच यापुढे गायत्रीने मन्नाराला पाठिंबा दर्शवत तिला खंबीर राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, अभिनेत्री गायत्री दातार ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून घराघरांत पोहोचली. तसेच गायत्रीनेही ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात सहभाग घेतला होता. या शोमधील तिच्या खेळाची बरीच चर्चा झाली होती. अशातच तिच्या या पोस्टची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगत आहे.