कलाक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींना सहज यश मिळणं अगदी अवघड असतं. तासन् तास काम केल्यानंतर कलाकारांनी केलेली मेहनत पडद्यावर दिसते. पण अनेक कलाकारांना अधिकाधिक काम करुनही आपल्या कामाचा मोबदला वेळीच मिळत नाही. काही कलाकार याबाबत उघडपणे बोलतानाही दिसतात. आता असाच प्रकार अभिनेत्री गौतमी देशपांडेबरोबर घडला आहे. गौतमीने इन्स्टाग्रामद्वारे स्टोरी शेअर करत याबाबत सांगितलं. (Gautami Deshpande shared screenshot)
गौतमीने इन्स्टाग्रामद्वारे मॅसेजचा स्क्रिनशॉट शेअर केला. यामध्ये तिने समोरच्या व्यक्तीला “पैसे ट्रान्सफर केले का?” असा मॅसेज केला. यावर “थांब मी चेक करते” असं उत्तर देण्यात आलं. पण दोन दिवस काहीच रिप्लाय नसल्यामुळे तिने संबंधित व्यक्तीला पुन्हा मॅसेज केला. दरम्यान तिने मॅसेज करत तिचा संताप व्यक्त केला. शिवाय कलाकारांना पैश्यांसाठी रखडवलं जातं याविषयी भाष्य केलं.

ती म्हणाली, “अनेकदा मी तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. एखाद्या कलाकाराला या गोष्टीसाठी एवढा वेळ पाठपुरावा करावा लागतो ही गोष्ट न स्वीकारण्यासारखी आहे. सोमवारपर्यंत माझे पैसे मला ट्रान्सफर करा”. तिच्या या मॅसेजवरही समोरच्या व्यक्तीचा रिप्लाय येत नाही. पुन्हा ती मॅसेज करते की, “तुम्ही रिप्लायसुद्ध करु शकत नाही. तुम्हाला जर या मॅसेजला उत्तर देत नसाल तर मी हा संपूर्ण प्रकार इन्स्टाग्रामद्वारे उघडकीस आणेन”.
स्क्रिनशॉट शेअर केल्यानंतर गौतमीने पैसे न देणाऱ्या लोकांना चांगलंच सुनावलं. ती म्हणाली, “जेव्हा पैशांचा प्रश्न येतो तेव्हा लोक असं वागतात. आता याक्षणी मी खूप निराश आहे. आम्ही काम करतो पण त्याबदल्यामध्ये आम्हाला अशी वागणूक मिळते. स्वतःच्या पैशांसाठी आम्हाला कित्येकदा पाठी लागून पाठपुरावा करावा लागतो”. फक्त गौतमीच नव्हे तर याआधी बऱ्याच कलाकारांबरोबर हा प्रकार घडला आहे.