काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी त्यांच्या मैत्रीण रुपाली बरुआसह लगीनगाठ बांधली. आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली. कारण याआधी त्यांचं पीलू विद्यार्थी यांच्यासोबत लग्न झालं होतं. त्यामुळे त्यांच्या दुसऱ्या लग्नाच्या बातमीने साऱ्यांनाच धक्का बसला. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट केव्हा घेतला? त्यांच्यात असं अचानक काय बदललं ? असे अनेक प्रश्न चाहत्यांसमोर उपस्थित झाले. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत आशिष विद्यार्थी यांच्या पहिल्या पत्नी पीलू विद्यार्थी यांनी त्यांच्या घटस्फोटामागचं खरं कारण सांगितलं आहे. (Piloo Vidyarthi On Ashish Vidyarthi)
इटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पीलू विद्यार्थी यांनी त्यांच्या व आशिष विद्यार्थी यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, “‘माझं आणि त्यांचं नातं इतकं चांगलं होतं की आम्ही एकमेकांचे मित्र होतो. इतकंच नव्हे तर माझ्या सासू- सासऱ्यांसहही माझं नातं खूप छान होतं. त्यांच्याकडून काहीच अडचण नव्हती. पण मीच या नात्यात खुश नव्हते. मी स्वतःला एका पत्नीच्या नात्यातून मोकळं करू इच्छित होते.”
“अनेकांनी मला विचारलं की, तू तुझ्या नवऱ्याला का वाचवत आहेस, तो तुझ्याशी वाईट वागला आहे का मात्र असं काहीच नाही. इतके दिवस मी माझ्या मताने या गोष्टींवर भाष्य केलं नाही. पण एक दिवस मला जाणवलं की माझ्या आवडी बदलल्या आहेत. प्रामाणिकपणे सांगायचं तर दीड वर्ष आम्ही यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. पण आमची ध्येय वेगळी असल्याचं आम्हाला जाणवलं. भविष्यासाठीचे आमचे विचार खूप वेगळे आहेत.”

“मी एक स्वतंत्र विचारांची व्यक्ती आहे. आम्ही एकत्र खूप चांगला वेळ घालवला मी तेव्हाही आनंदी होते आणि आताही आनंदी आहे. प्रत्येकवेळी पुरुषाची चूक नसते. फेसबूकवर काही जण लिहीत आहेत की मी खोटं बोलत आहे. पण तसं नाही. मला आता कोणत्याही नात्यात राहायचं नाही. माझे माझ्या भविष्याचे विचार वेगळे आहेत आणि आशिष त्याचा आदर करतो. तो आनंदी आहे की मी माझा रस्ता निवडला. ज्या स्त्रिया घर संसारात रमतात ती त्यांची निवड असते. मी वेगळी वाट निवडली आहे.”