सध्या सर्वत्र कान्स फिल्म फेस्टिव्हलची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. यंदाच्या कान्स महोत्सवात भारताने बाजी मारली म्हणून सर्वत्र याचा बोलबाला सुरु असलेला पाहायला मिळत आहे. यंदा कान्सच्या महोत्सवात एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या चित्रपटाचं भरभरुन कौतुक करण्यात आलं त्यामुळे ही अभिनेत्री सध्या विशेष चर्चेत आहे. ही अभिनेत्री म्हणजे छाया कदम. आजवर छाया कदम यांनी त्यांच्या अभिनयाने सिनेसृष्टीत आपली छाप पाडली आहे. छाया कदम यांच्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाचा कान्समध्ये गौरव करण्यात आला. (Chhaya Kadam On Cannes Film Festival)
या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आईची साडी, नथ, केसात गजरा आणि कपाळावर टिकली असा मराठमोळा लूक करुन गेलेल्या छाया कदम चर्चेत आल्या. आईच्या साडीच्या पेहरावाबद्दल छाया यांनी नुकत्याच ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. कान्सहून भारतात परतल्यानंतर छाया यांनी पहिली मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “माझा आईवर खूप जीव होता. आई हे माझं बाळ होतं. मी सगळ्या गोष्टी आईसाठी केल्या पण विमानप्रवास तिचा मला घडवून आणता आला नाही.
पुढे त्या म्हणाल्या, “माझी आई गावी राहत होती. शेवटी येताना मी तिला सांगितलं होतं, तू थोडी तरतरीत राहा. माझा भाचा दहावीत होता. त्यामुळे मेमध्ये त्याची परीक्षा झाली की मग विमानाने प्रवास करायचा असं मी तिला सांगून आले. पण ते शक्य झालं नाही. आणि ती साडी माझ्या मैत्रिणीने माझ्या आईला भेट म्हणून दिली होती. त्या साडीच असं होतं की, गावी ती साडी घेऊन गेले तेव्हा आई आजरपणामुळेसाडी नेसायला कंटाळा करायची. म्हणून दिवाळीत आई मुंबईत येणार म्हणून ती साडी मी मुंबईत आणली. पण त्यावेळीही ती साडी आईला नेसवणं राहून गेलं. त्या साडीने मुंबई ते गांव असा अनेकदा प्रवास केला. आणि आईची ती साडी नेसायची इच्छा राहून गेली. त्यानंतर आई गेली”.
“मग माझ्या मनात सतत येत राहायचं की, आईचा विमानप्रवासही राहिला आणि आईला ती साडी नेसवायचीही राहिली. जेव्हा कान्सचं समोर आलं तेव्हा माझ्या मनात आलं की, आईला हा असा प्रवास घडवून आणायचा. आणि ताईच्या लग्नावेळेची आईची नथ होती ती मी घातली होती. ती साडी आणि नथ घालून मी पूर्ण कान्स खूप फिरले. आणि तिथल्या लोकांना ते फार कौतुकास्पद वाटलं”, असंही त्या म्हणाल्या.