‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. अश्विनीला या मालिकेतील अनघा या भूमिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. अभिनयाबरोबर अश्विनी सामाजिक कार्यात विशेष लक्ष देताना पाहायला मिळते. समाजाप्रती, गड, किल्ले यांविषयी तिची असणारी तळमळ नेहमीच पाहायला मिळते. महाराजांविषयी नेहमीच अश्विनीच्या मनात अपार श्रद्धा असलेली पाहायला मिळाली. कायमच ती महाराजांची महती सोशल मीडियावरून शेअर करताना दिसते. (Ashvini Mahangade On Chhatrapati Shivaji Maharaj)
अश्विनीची सध्या एक मुलाखत वाऱ्यासारखी पसरली आहे. ‘अजब गजब’ या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिने छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख करत एक वक्तव्य केलं आहे. हे वक्तव्य सर्वदूर पसरलं असून तिने केलेल्या या वक्तव्याचं प्रेक्षकांकडून कौतुक केलं जात आहे. अनेकांनी महाराजांबद्दल केलेल्या या वक्तव्यावरून तिला पाठिंबा दर्शविला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास याबद्दल अश्विनी कायमच धडे देत असते. गड किल्ल्यांच्या संरक्षणासाठीचे धडेही ती गड किल्ल्यांवर जाऊन देत असते. याचे अनेक व्हिडीओ तिच्या सोशल मिडीयावर पाहायला मिळतात.
अशातच महाराजांचं नाव घेत अश्विनीने केलेलं एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यावेळी ती असं बोलतेय की, “आता आपण बघतो ९० वर्षांच्या आजी या राज्याभिषेकादिवशी किंवा शिवजयंतीला त्या रायगडावर जातात. ही त्यांच्यात ऊर्जा कुठून येते? आणि अशा वेळेला काही लोकं मला म्हणतात, काय तुम्ही सारखं शिवाजी महाराज, शिवाजी महाराज करत असतात. म्हणजे किती वेगवेगळ्या विचारांची माणसं आपल्या आजूबाजूला आहेत. त्यावेळेला मला त्यांच्यावर हसू येतं. जर महाराज नसते ना तर तुमची आडनावं मुल्ला, खान अशी असती. जे आता आपण सांगतो ना की, या या जातीचे, आम्ही बारा बलुतेदार, अठरा पगड जातीचे हे हे आहोत. हे का सांगताय तुम्ही? काय राहिलं असतं आपलं?”.
अश्विनीने केलेलं हे वक्तव्य नेटकऱ्यांना पटलं असून ‘अगदी बरोबर बोलताय’, ‘सत्य’ अशा प्रकारच्या कमेंट करत तिला पाठिंबा दर्शविला आहे. तर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहीलं आहे, “हे बोलायला हिंमत लागते.”