‘आभाळमाया’, ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘हम बने तुम बने’, ‘अजूनही बरसात आहे’ तसेच ‘आई कुठे काय करते?’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांच्या लेखिका म्हणून मुग्धा गोडबोले या चांगल्याच लोकप्रिय आहेत. मुग्धा या लेखिका असण्याबरोबरच एक उत्तम अभिनेत्रीदेखील आहेत. मुग्धा या त्यांच्या अभिनय व लेखनामुळे जितक्या लोकप्रिय आहेत. तितक्याच त्या स्पष्टव्यक्त्याही आहेत. त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या अनेक विषयांवर त्यांची मते स्पष्टपणे व्यक्त करत असतात. (Mugdha Godbole Ranade On Facebook)
नुकतीच मुग्धा यांनी त्यांच्या फेसबुकद्वारे एक पोस्ट शेअर केली असून ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. मुग्धा यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटद्वारे त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल पोस्ट लिहीत संताप व्यकात केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “गेले कित्येक दिवस म्हणजे जवळपास २० ते २५ दिवस आमच्या घराजवळच्या दोन मैदानांवर रोज संध्याकाळी ७ वाजल्यापासून मेळा, जत्रा, जाहीर कार्यक्रम सुरू आहेत. रात्री १० किंवा १०.३०ला संपतात. पण रोज संध्याकाळी ७ ते रात्री १० जे असतं तेही त्रासदायकच असतं. माईकवरून भसाड्या आवाजात गाणारे, मोठ्याने लावलेले स्पीकर्स, अगदी सुंदर मराठी गाणीसुद्धा रोज संध्याकाळी एवढ्या मोठ्या आवाजात का ऐकायची?. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी महिना-महिना हे का सहन करायचं?”
तसेच यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “आज कसलीतरी जत्रा, उद्या महोत्सव, परवा कुठलातरी प्रादेशिक बाजार यांचं संपतच नाही. याबद्दल काही बोलायची सोय नाही. कारण सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अंतर्गत हे सगळं मोडतं. याच मैदानांवर असंख्य वेळा असंख्य कारणांनी फटाके उडवले जातात. ध्वनी प्रदुषण म्हणजे काय रे भाऊ अशी अवस्था आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत लोक बाहेर जातात तसं आता यंदा या लादलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या हंगामात इथून बाहेर कुठेतरी जावं का? याचा विचार करावा लागणार.”
दरम्यान, या पोस्टखाली नेटकऱ्यांनीदेखील अनेक कमेंट्स करत याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मुग्धा यांना कमेंट्सद्वारे काही उपायदेखील सुचवले आहेत. “खर आहे अमच्याइथे पण हे प्रकार सर्रास होत असतात, कोणाला बोलायची सोय नाही, लेखी तक्रारी करा, डेसिबल मीटर रिडींग मागा, तक्रारी करा, योग्य मुद्द्याला वाचा फोडली ताई, हे जवळपास सगळीकडेच चालते” अशा अनेक कमेंट्सद्वारे त्यांनी मुग्धा यांच्या या पोस्टला पाठिंबा दर्शविला आहे.