अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकली. अमृता-प्रसादच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला. ‘बिग बॉस’ मराठीमुळे ही जोडी विशेष चर्चेत आली. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम फुलत गेलं. अखेर सोशल मीडियावरून त्यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. प्रसाद-अमृताच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. याचे औचित्य साधत त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Amruta Deshmukh Prasad Jawade Wedding)
अमृताने लिहिलेल्या स्वरचित कवितेला लग्नाच्या पत्रिकेवर हस्तलिखित रूप दिलेली त्यांच्या लग्नाची पत्रिका शेअर केली. “समांतर असा सुरू होता, त्या दोघांचा प्रवास. अनपेक्षित क्षणी आला, सक्तीचा सहवास. भिन्न स्वभाव, भिन्न विचार, प्रेमावर मात्र दृढ विश्वास. आधी त्याने घेतला हातात हात, मग तिने सोडली नाही, कधीच त्याची साथ. दोन मनांचा सुरू झाला होता, Experimental संवाद. मात्र कायम सुखी जीवनासाठी हवेत आता, फक्त तुमचे आशीर्वाद” हे अमृताची कविता त्यांनी त्यांच्या पत्रिकेवर छापली आहे.
प्रसाद-अमृताने शनिवार (१८ नोव्हेंबर) रोजी या जोडीचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. अमृता-प्रसादच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असलेली पाहायला मिळाली. पुण्यातील एका रिसॉर्टमध्ये पार पडलेल्या त्यांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. अगदी शाही थाटामाटात प्रसाद-अमृताचा लग्नसोहळा पार पडला. दोघांच्या लूकचीही जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.
प्रसाद-अमृताच्या प्रेमकहाणीबद्दल बोलायचे झाले तर, या दोघांनी ‘बिग बॉस’मराठी कार्यक्रमात एकत्र सहभाग घेतला होता. प्रसाद-अमृताच्या लग्नाला सिनेसृष्टीतील कलाकारांनीही धमाल-मस्ती केली असल्याचं पाहायला मिळालं. तर प्रसाद-अमृताच्या लग्नानंतर त्यांच्या चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.