मराठी नाटक, मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे वैभव मांगले. ‘वाडा चिरेबंदी’, ‘करून गेलो गाव’, ‘अलबत्या गलबत्या’ यांसारखी अनेक नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याशिवाय, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘माझे पती सौभाग्यपती’सारख्या मालिका व ‘काकस्पर्श’, टाईमपास’, ‘शाळा’, ‘कुटुंब’, ‘फक्त लढ म्हणा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या विविधांगी भूमिका करत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. (Vaibhav Mangle On Animal)
वैभव हे अभिनयातच नाही, तर गायन, सूत्रसंचालन व विनोदी कलाकार म्हणूनही चांगलेच प्रसिद्ध आहेत. वैभव मांगले हे सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे ते आपले अनेक फोटो, व्हिडीओज व कामासंबंधीची माहितीही शेअर करतात. त्याचबरोबर ते समाजातील विविध मुद्द्यांवरही परखडपणे भाष्य करताना दिसतात. अशातच त्यांनी केलेल्या एका पोस्टमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सध्या देशभर ‘अॅनिमल’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. तरुणवर्गांसह अनेकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ आहे. अशातच वैभव मांगले यांनी ‘अॅनिमल’ या चित्रपटावरुन फेसबुकवर एक पोस्ट शेयर केली आहे आणि या पोस्टद्वारे त्यांनी एक प्रश्नही उपस्थित केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, “‘अॅनिमल’ आणि ‘अल्फा मेल’ या दोन गोष्टींआडून अनेक गोष्टींचे समर्थन दिग्दर्शकाने केले आहे जे खूप घातक आहे. (उदा. हिंसा आणि लैंगिकता) असे वाटते का?” दरम्यान, अभिनेत्याने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या पोस्टवर अनेकांनी “हो नक्कीच घातक आहे. खास करून नुकत्याच तारुण्यावस्थेत पदार्पण केलेल्या मुला-मुलींसाठी असे चित्रपट घातक आहेत, होय १००%, हे भावी पिढीसाठी खुप घातक आहे, आजकाल नको त्या गोष्टी मुद्दाम सामान्य मानण्याचा केलेला प्रयत्न दिसून येतो, अगदी बरोबर, नवीन पिढी अधोगतीकडे चालली आहे” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. या पोस्टखाली कमेंट्सद्वारे काहींनी या चित्रपटाच्या समर्थनार्थ तर काहींनी निषेधार्थ आपलं मत व्यक्त केलं आहे.