अमृता देशमुख व प्रसाद जवादे ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडी आहे. दोघेही ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात एकत्रितपणे दिसून आले होते. या शोदरम्यान त्यांच्यामध्ये घट्ट मैत्री झाली. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी काही महिन्यातच साखरपुडा उरकला आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी नोव्हेंबरमध्ये एकमेकांशी लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर दोघांचेही अनेक व्हिडीओ व फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात. (amruta deshmukh first manglagaur)
अमृता व प्रसाद यांचा लग्नसोहळा १८ नोव्हेंबरला थाटामाटात पार पडला. लग्नसोहळ्यासाठी अनेक कलाकारांनीदेखील उपस्थिती दर्शवली होती. आता लग्नानंतरची पहिलीच मंगळागौर अमृताने साजरी केली. पहिल्या मंगळागौरसाठी प्रसादने देखील व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून अमृतासाठी उपस्थित राहिला. मंगळागौरचे काही फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
अमृताने प्रसादबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, “नटून थटून मंगळागौर साजरी केली. प्रसादसारखा उत्साही नवरा कुठेही मिळणार नाही. ज्याच्यासाठी हे व्रत केले त्याची या सोहळ्याला इतकी छान साथ मिळते तेव्हा आनंद अजूनच द्विगुणित होतो”. दरम्यान शेअर केलेल्या फोटोमध्ये अमृताच्या लूकनेदेखील सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. यावेळी अमृताने मंगळागौरसाठी खास शाही लूक केला होता. तिने लव्हेंडर रंगाची साडी नेसली होती. तसेच त्यावर साजेसे असे दागिनेदेखील घातले होते. केसांचा अंबाडा व नाकात पारंपरिक नथ यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसून आले होते.
याचबरोबर प्रसादने देखील फिकट पांढऱ्या रंगाचा कुर्ता व धोतर परिधान केले होते. या लूकमध्ये तो खूपच राजबिंडा दिसून येत होता. दोघांच्याही लूकला सगळ्यांची पसंती मिळाली आहे. तसेच तिचे मंगळागौर पूजनाचे फोटोदेखील समोर आले असून महिलांसह ती पूजा करताना दिसत आहे.