Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे गेले तीन आठवडे चांगलेच गाजले. हे तिन्हा आठवडे गाजवण्यात घरातील काही सदस्यांचा मोठा वाटा होता. निक्की, जान्हवी, अरबाज, वैभव यांनी आतापर्यंत आरेरावी, धमकी, अंगावर धावून येणं, अपशब्द वापरणं असे अनेक प्रकार केले. कित्येकदा भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने समजावूनही या सगळ्यांमध्ये अजूनही कोणताच फरक पडलेला दिसत नाही. वर्षा उसगांवकरांचा अपमान, त्यांच्या करिअरवर भाष्य केल्यानंतर निक्कीला रितेशने चांगली समज दिली होती. पण यानंतरही घरातील चित्र फारसं काही बदलेलं दिसत नाही. शिवाय वैभवला त्याचा गेम तसंच वागणं सुधारायला हवं असा सल्ला देण्यात आला होता. मात्र त्याने आता रागाच्या भरात एक मोठी चूक केली आहे. (Bigg Boss Marathi Daily Update)
‘बिग बॉस’कडून घरातील सदस्यांना सत्याचा पंचनामा हा विशेष टास्क देण्यात आला होता. या टास्कदरम्यान वैभवला एका रुममध्ये बोलावण्यात आलं. यावेळी “आपण आपल्या ग्रुपमधील सगळ्यात कमकुवत सदस्य आहात. खरं की खोटं?” असा प्रश्न ‘बिग बॉस’ने वैभवला विचारला. “हे खोटं आहे” असं वैभवने उत्तर दिलं. मात्र टीम बीला वैभवच्या उत्तराशी सहमत होणं गरजेचं होतं. तरच त्याला बीबी करन्सी मिळाली असती. पण टीम बीने त्याच्या मताशी सहमती दर्शवली नाही.
वैभव टास्क रुममधून बाहेर येताच त्याचा राग अनावर झाला. तो रागाच्या भरात काहीही बोलून गेला. “साले तुम्ही सगळे फट्टू आहात. माझ्या गेमवर बोलायचं नाही. तुम्हाला इथून पळवून नाही लावलं ना तर बघा”. हे सगळं सुरु असताना वैभव ओरडत पॅडीच्या अंगावर गेला आणि त्याने अपशब्दांचाही वापर केला. शिवाय टीम बीमधील सदस्यांना त्याने फालतू म्हटलं. यावर आर्याने बोलायला सुरुवात केली. तितक्यातच वैभवचा पारा आणखीनच चढला. त्याला त्याचंच भान राहिलं नाही.
वैभव ओरडत म्हणाला, “अरे ए शांत बस्स. तुला बोललो नाही मी. तुला तर असे झापडेन ना आता (कानाखाली किंवा मारेन असा याचा अर्थ होता) तुला इज्जत आहे आम्हाला मुलांना इज्जत नाही का? तुझ्यासारखा मी घाणेरडा नाही. तुम्हा सगळ्यांना मस्ती आली आहे”. टीम एने फक्त इतर सदस्यांना धमक्या दिल्या. शिवाय शिव्या देणंही सोडलं नाही. वैभवने तर आर्याबाबत केलेलं वक्तव्य अतिशय लज्जास्पद होतं. आता रितेश यावर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.